मुलांना कफ सिरप देताय? सावधान! विषारी औषधानं आतापर्यंत 24 लेकरं दगावलीत, ही औषधं बिलकुल देऊ नका, काय काळजी घ्याल?

Cough Syrup Alert: हे रसायन अतिशय विषारी असून मूत्रपिंड निकामी होणे, मेंदूवर परिणाम होणे आणि विशेषतः मुलांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता निर्माण करणारे आहे.
Cough syrup Health Advisory: बदलत्या हवामानात मुलांना फ्ल्यू आणि खोकल्यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. सर्दी खोकला पटकन बरा व्हावा म्हणून अनेक पालक आपल्या मुलांना कफ सिरप देताना दिसतात. पण सध्या राजस्थान आणि मध्य प्रदेशात तयार झालेल्या कफ सिरपमुळे देशभरात लहान बालकांचे मृत्यू होत आहेत. (Cough Syrup) महाराष्ट्रातही नागपूरमध्ये मुलांचा मृत्यू झाला. केंद्र सरकारने काही कफ सिरपवर बंदी घातली आहे. गेल्या महिन्यात पाच वर्षंखालील 17 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यासंबंधी करण्यात आलेल्या तपासात बालकांच्या मृत्यूचा संबंध विषारी कप सिरपमुळे झाल्याचं आढळलं असून जागतिक आरोग्य संघटनेनेही यात लक्ष घातलं आहे.
कफ सिरपमुळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूमुळे देशभरात घबराट पसरली आहे. दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नये तसेच चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देताना काळजी घ्यावी यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
खोकल्याच्या औषधात विषारी रसायन 500 पट अधिक
मृत्यू झालेल्या बालकांच्या खोकल्याचा औषधात ‘diethylene glycol’ हे विषारी रसायन प्रमाणित मर्यादेपेक्षा तब्बल 500 पट अधिक प्रमाणात आढळले. या सर्व मृत्यूंचा संबंध या औषधाची जोडला गेला असून 2 ऑक्टोबरला या औषधांच्या नमुन्यात हे रसायन आढळल्याने सरकारने ते तात्काळ बंद केले आहे..
भारतीय कायद्यानुसार, प्रत्येक औषधी निर्मात्याने वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालासह तयार उत्पादनाची तपासणी करणे बंधनकारक आहे. 2023 पासून परदेशी निर्यातीपूर्वी सरकार मान्य प्रयोगशाळांमधून अतिरिक्त तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. गॅबिया, उजबेकिस्तान आणि कॅमेरून येथील भारतीय सिरपमुळे 140 हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्यानंतर हे नियम लागू करण्यात आले.
या कफ सिरपवर बंदी, चुकुनही वापरू नका
धोकादायक रसायने असलेल्या कफ सिरप खाल्ल्याने या मुलांचा मृत्यू झालाय . सर्वात प्रमुख कफ सिरप म्हणजे “कोल्ड्रिफ”. मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळच्या सरकारने त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. ते “श्रीसन फार्मास्युटिकल्स” द्वारे उत्पादित केले जाते. पीटीआयनुसार, छिंदवाडा येथील प्रशासनाने ‘कोल्ड्रिफ’ आणि आणखी एक खोकल्याचे औषध ‘नेक्स्ट्रो-डीएस’ च्या विक्रीवर बंदी घातली होती. ‘कोल्ड्रिफ’ चा अहवाल शनिवारी प्राप्त झाला, तर ‘नेक्स्ट्रो-डीएस’ चा अहवाल प्रलंबित आहे.



