Ind Vs Pak Asia Cup: आम्हाला वाटतंच होतं, पाकिस्तान काहीतरी करेल, सूर्यकुमार यादवने सांगितली टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील इनसाईड चर्चा

Ind Vs Pak Asia Cup: भारत-पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यानंतर दुबईत नेमके काय घडले, याबद्दल सविस्तर तपशील सांगितला. आम्ही दीड तास ट्रॉफी घेण्यासाठी मैदानात उभे होतो.
Ind Vs Pak Asia Cup Suryakumar Yadav: आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचे सोमवारी रात्री त्याच्या देवनार येथील निवासस्थानी आगमन झाले. यावेळी येथील नागरिकांनी सूर्याचे जल्लोषात स्वागत केले. त्याच इमारतीत राहणारे शिवसेनेचे माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी सोसायटीतील पदाधिकारी आणि परिसरातील जनतेसह सूर्यकुमार यादव याचे शाल, पुष्पहार आणि तिरंगा देऊन अभिनंदन केले. यावेळी सूर्यकुमाराचे औक्षणही करण्यात आले. त्यानंतर सूर्यकुमार याने शेवाळे यांच्या घरी विराजमान झालेल्या दुर्गामातेचे आशीर्वाद घेतले आणि चाहत्यांसोबत फोटोसेशन देखील केले. यानंतर सूर्यकुमार यादव याने ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना आशिया कप स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. (Ind Vs Pak Final Match)
आशिया चषक जिंकल्यानंतर मला खूप चांगलं वाटत आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडियातील सर्व खेळाडूंना घरी जाण्याचे वेध लागले होते. माझे विमान दोन दिवसांनी होते. मात्र, मी आजच घरी आलो. आशिया चषक स्पर्धेचा दौरा मोठा असल्याने जवळपास 25 दिवस आम्ही घरापासून लांब आहोत. पहिल्या 12-13 दिवसांत आ्ही फक्त तीन सामने खेळलो, त्यानंतर पटापट आमचे सामने होते. आता घरी आल्यानंतर येथील नागरिकांना माझे स्वागत केले, याचा आनंद वाटला. मी विमानात असताना मला बायको सारखं फोन करुन विचारत होती, कुठे आलात, तुम्ही किती वेळात पोहोचणार? आता माझे ज्याप्रकारे स्वागत झाले आहे, हे निश्चित मनाला सुखावणारे आहे, असे सूर्यकुमार यादव याने सांगितले.
Ind Vs Pak Final Match: आम्हाला वाटतंच होतं, पाकिस्तान काहीतरी करेल: सूर्यकुमार यादव
आशिया कप स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावेळी असणाऱ्या दबावाबाबत सूर्यकुमार यादवने भाष्य केले. तो म्हणाला की, भारत-पाक सामन्यावेळ मैदानात थोडंफार प्रेशर नक्कीच असते. पण मी च्युईंगम आणि स्माईलच्या आड हे प्रेशर लपवतो. अनेकदा मी इतर सहकाऱ्यांशी बोलत राहतो, असे सूर्याने सांगितले. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना वैफल्य आले होते. याच वैफल्यामुळे ते मैदानात आणि पत्रकार परिषदांमध्ये वेगळंच काहीतरी बोलत होते. या सगळ्या गोष्टींमुळे कितीही नाही म्हटले तर लक्ष विचलित होण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून ठरवले की, आपण सर्व फोकस फक्त क्रिकेटवर ठेवू. त्यांना जे करायचंय ते करु दे. आशिया कप स्पर्धेतील सामना जिंकल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं, तिकडून काहीतरी येणार, आम्ही सुपर-4 मध्ये खेळणार तेव्हा किंवा फायनलमध्ये येणार तेव्हा. पण आम्ही चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळायचे ही एकच गोष्ट डोक्यात ठेवली होती, असे सूर्यकुमार यादव याने सांगितले.




