‘उध्दव ठाकरेंनी महाराष्ट्राला दारूडा बनवण्याचा प्रयत्न केला, त्यापेक्षा…’; फडणवीसांवरील टीकेला आक्रमक उत्तर

BJP Slams Uddhav Thackeray: फडणवीसांचे सरकार महाराष्ट्रात मांसाहारावर बंदी आणते ते कोणाला खूश करण्यासाठी? असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारलेला.
BJP Slams Uddhav Thackeray: राज्यसभेचे खासदार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त करताना ‘महाराष्ट्राला शाकाहारी करण्याचा डाव’ असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबरच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यातील अनेक नगरपालिका क्षेत्रांमध्ये मांस विक्री बंदीवरुन टीका करताना, “सुरतमधून शिंदे यांचे आमदार गुवाहाटी येथे पोहोचले व 55-60 रेडे, बकऱ्या, कोंबड्यांचे बळी दिले. त्या बळी प्रथेची परंपरा अशी की, बळी दिलेल्या प्राण्याचे मांस शिजवून प्रसाद म्हणून भक्षण करावे लागते. त्यामुळे रेड्याचे मांस पचवून आमदार मुंबईस आले. फडणवीसांचे सरकार मांसाहारातून निर्माण झाले. तेच आता स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रात मांसाहारावर बंदी आणते ते कोणाला खूश करण्यासाठी?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. याच टिकेला आता भाजपाने जशास तसं उत्तर दिलं आहे.
…हा तर निव्वळ ढोंगीपणा
“उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्याची कॉपी महाराष्ट्रात करून महाराष्ट्राला दारुडे बनवण्याचा डाव रचणाऱ्यांनी आता शाकाहार, मांसाहार, नैवेद्य यावर बोट ठेवून उपदेशाचे चाटण लावणे हा तर निव्वळ ढोंगीपणा,” असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन ‘सामना’च्या वेबसाईटवरील संजय राऊतांच्या लेखाचा स्क्रीनशॉट शेअर करत हे विधान केलं आहे.
त्यापेक्षा शाकाहारी महाराष्ट्र ही ओळख चांगलीच
“मुळात इथे कुणी कुणाला शाकाहारी करण्याचा प्रयत्न करत नाही पण उध्दव ठाकरेंनी हा महाराष्ट्र दारूडा करण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा शाकाहारी महाराष्ट्र ही ओळख चांगलीच,” असा टोला भाजपाने लगावला आहे. “देवाला मांस अर्पण करण्यापेक्षा माणसाच्या जीवनात सात्विकता, संयम आणि नैतिकता आणणे हेच खरे धर्मकारण आहे. म्हणूनच संत सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी,” असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.




