Bhaskar Jadhav news: अरे कितीबी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास! ब्राह्मण महासंघाशी वादानंतर भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा

Bhaskar Jadhav and brahman Mahasangh: ब्राह्मण महासंघाशी वाद, आता भास्कर जाधवांची कडाडून टीका. ‘भिडा किती, तुम्ही नडा किती, द्या द्यायचा तेवढा त्रास… कितीबी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास’
Bhaskar Jadhav and brahman Mahasangh: हेदवतडमधील सभेत खोतकीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि ब्राह्मण महासंघात वादाचा ठिणगी पडली होती. हेदवतड येथील राजकीय सभेमध्ये मी जर एखादे राजकीय वाक्य बोललो, तर त्याचा संबंध संपूर्ण ब्राह्मण समाजाशी जोडणे योग्य नाही, असे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी म्हटले होते. तर ब्राह्मण महासंघानेही (brahman Mahasangh) भास्कर जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. भास्कर जाधव हे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्यातील ऐक्याला बाधा आणत आहेत. त्यांनी राजकीय प्रवासात ब्राह्मण समाजातील अनेक उंबरठे आणि ओट्या झिजवल्याची आठवणही ब्राह्मण महासंघाने करुन दिली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी त्यांच्या व्हॉटसअॅप स्टेटसवरुन ब्राह्मण संघाला इशारा देत दंड थोपटले आहेत. भास्कर जाधव यांनी स्टेटसला एक गाणे ठेवले आहे. ‘भिडा किती, तुम्ही नडा किती, द्या द्यायचा तेवढा त्रास… कितीबी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास‘, असा आशयाचे हे गाणे आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघ आणि भास्कर जाधव यांच्यातील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.
भास्कर जाधव यांनी गुहागरच्या हेदवतडमधील सभेत भाजपचे दिवंगत आमदार तात्यासाहेब नातू यांचा उल्लेख केला होता. 1975 पासून राजकीय प्रवास मांडत गुहागरचे भाजपचे तत्कालीन आमदार स्वर्गीय तात्यासाहेब नातू यांच्या निवडणुकीतला प्रचारातील सक्रिय सहभाग घेतल्याची आठवण भास्कर जाधव यांनी करून दिली होती. गुहागरच्या इतिहासात पहिल्या पंचायत समिती सभापती ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला बसवल्याचेही त्यांनी म्हटले होते. याशिवाय भास्कर जाधव यांनी गुहागर तालुका ब्राम्हण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनशाम जोशी यांना एक जाहीर पत्र लिहले होते.
या पत्रातून भास्कर जाधव यांनी घनशाम जोशी यांच्यावर टीकेचे आसूड ओढले होते. इतिहासाचे सिंहावलोकन मी जरुर करतो पण त्यामध्ये रमणारा कार्यकर्ता नाही. मी फायद्यासाठी पक्षांतर केलं? पण तुम्ही युतीमध्ये राहून गद्दारी करणारे गद्दार आहात. माझे प्रिय मित्र विनूभाऊ मुळे यांचा उल्लेख आपण पत्रामध्ये केला आहात. त्यांच्या पत्नीला मी दोन वेळा गुहागर पंचायत समितीच्या सभापती केलं. गुहागर तालुक्यात ब्राह्मण समाजातील व्यक्तीला प्रथमच सभापती होण्याचा बहुमान मी मिळवून दिला. त्याबद्दल एखादे कौतुकाचे पत्र पाठवण्याकरता तुम्हाला लाजच वाटली असावी. तसेच प्रवीण ओक यांचा उल्लेख आपण केलात. त्या प्रवीण ओक व त्यांच्या सौभाग्यवती पूर्वा ओक यांना देखील दोन दोन वेळेला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली व त्यांना निवडून आणलं. श्रीमती गीता खरे यांना नगरपंचायतीमध्ये निवडून आणून सभापती केलं, हे तुम्ही सोयीस्कररित्या विसरलात. त्यामुळे एखाद्या राजकीय सभेमध्ये मी जर एखादे राजकीय वाक्य बोललो असेल तर त्याचा संपूर्ण समाजाशी संबंध जोडणं हे तुमच्यासारखे पाताळयंत्रीच करू शकतात.
मी राजकारणात आहे म्हणजे निवडणुका जिंकणं हे मी माझं कर्तव्यच समजतो, मी काय आश्रमशाळा नाही चालवत. 2007 साली मी गुहागरमध्ये काम करायला सुरुवात केली, भोळ्याभाबड्या जनतेचा त्रास व दुःख डोळ्याने पाहिले. लेखणीचा दहशतवाद पाहिला. या जाचातून मुक्त होण्यासाठी ते एका आश्वासक नेतृत्वाची वाट पाहत होते आणि माझ्या रुपात त्यांनी ते पाहिले ही का माझी चूक? कामाने आणि संपर्काने मला हरवता येत नाही म्हणूनआपल्यासारख्या अनेक महानुभवांनी मला बदनाम करण्यासाठी वारंवार षडयंत्र रचली, जाती-पातीच विष या तालुक्यात कालविण्याचे काम केले गेले, असे भास्कर जाधव यांनी पत्रात म्हटले होते.




