Rajabhau Munde : बीडमध्ये अजितदादांचा पंकजाताईंना दे धक्का, कट्टर समर्थक मुंडे पिता-पुत्र घड्याळ हाती घेणार

Rajabhau Munde : मागील 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
Rajabhau Munde : मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची साथ सोडत माजलगाव मतदारसंघातील मुंडे पिता-पुत्रांचा आज राष्ट्रवादी अजित पवार गटात (NCP Ajit Pawar Faction) पक्षप्रवेश होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी साडेपाच वाजता वडवणी शहरात या पक्षप्रवेशाचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे या दोघा पिता पुत्रांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश होणार आहे. माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश होतोय.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ते पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले. राजाभाऊ मुंडे हे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. बँकेतील आर्थिक अनियमितता प्रकरणी आणि बनावट संस्थाना कर्ज वाटप केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी ते 2 वर्षे तुरूंगात होते, तर, राजाभाऊ मुंडे यांचा मुलगा बाबरी मुंडे हे वडवणी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आहे. बाबरी मुंडे यांनी माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यांना 18000 मते मिळाली होती. दरम्यान या पक्षप्रवेशामुळे माजलगाव मतदार संघातील राजकीय समीकरण बदलणार हे निश्चित मानलं जात आहे. तर पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
धनंजय मुंडेंचा बॅनरवरून फोटो गायब
यादरम्यान धनंजय मुंडे यांना डावलण्यात आल्याचे देखील पाहायला मिळालं. या पक्षप्रवेशासाठी धनंजय मुंडेंना निमंत्रण नसल्याने ते उपस्थित राहणार नसल्याचं सांगण्यात आलं. तर वडवणी येथे पक्षप्रवेशाच्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचे फोटो देखील वगळण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.




