कोथरुड पोलिसांनी तिन्ही तरुणींचा कोठडीत छळ केला, पण एका स्टेटमेंटमुळे छ. संभाजीनगरच्या पोलिसांना हात हलवत माघारी फिरावं लागलं

Pune crime News: कोथरुड पोलिसांनी या मुलींची चौकशी करताना असभ्य भाषा वापरली होती. या मुलींच्या जातीवरुन शेरेबाजी केली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर गदारोळ झाला होता.
Pune Crime Dalit girls torture by Kothrud Police: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींचा छळ करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या मुलींनी कोथरुड पोलीस (Kothrud Police) आणि छत्रपती संभाजीनगर ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या सर्वांनी कोथरुड पोलीस ठाण्यात आमचा चार तास छळ केला, असा आरोप या तरुणींनी केला आहे. या मुलींसोबत असणारी विवाहित महिला तिच्या घरातून पळून आली होती. तिने एका दिवसासाठी या मुलींच्या कोथरुडमधील फ्लॅटवर आसरा घेतला होता. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati sambhaji nagar) पोलिसांना या विवाहित तरुणीचे मोबाईल लोकेशन कोथरुडमध्ये आढळून आले. त्यानंतर कोथरुड आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलीस कर्मचारी या मुलींच्या फ्लॅटवर आले होते. याठिकाणी झाडाझडती घेऊन या मुलींना कोथरुड पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.
मात्र, कोथरुड पोलीस ठाण्यात या मुलींची चौकशी केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस कर्मचारी आणि माजी पोलीस असलेल्या सासऱ्यांना रिकामी हाती माघारी फिरावे लागले होते. या विवाहित मुलीने कोथरुड पोलीस ठाण्यात आपल्याला सासरच्या मंडळींकडून त्रास होतो, असा जबाब दिला होता. मी स्वेच्छेने पुण्यात आल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस पथक रिकाम्या हातांनी माघारी परतले होते. या विवाहित मुलीच्या सासऱ्यांना त्यांच्या सूनेला परत नेता आले नव्हते.




