Raj Thackeray : विजयी मेळावा हा मराठीच्या मुद्द्यावर होता, राजकारणाशी त्याचा संबंध नाही; राज ठाकरेंचा सावध पवित्रा, ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सस्पेन्स वाढला

Raj Thackeray On MNS Shiv Sena Alliance : ठाकरेंच्या शिवसेनेने युतीसंबंधी टाळी दिली असली तरी राज ठाकरेंनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. युतीचा निर्णय नोव्हेंबर-डिसेंबर नंतर पाहू असं राज ठाकरे म्हणाले.
नाशिक : राज्यात महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबईतील मराठीचा विजयी मेळावा हा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, विजयी मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही असं राज ठाकरे म्हणाले. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान युतीचं चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर बघू असं राज ठाकरे म्हणाले. नाशिकमध्ये अनौपचारिक गप्पादरम्यान राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.
आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच असं वक्तव्य खुद्द उद्धव ठाकरे यांनी केलं. जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल असंही ते म्हणाले होते. त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युतीची चर्चा झाल्याचं बोललं जाऊ लागलं. दरम्यान, राज ठाकरे हे मात्र सावधगिरीने पावले टाकताना दिसले. आता त्यांचे ताजे वक्तव्य हे त्याला बळ देणारं असल्याची चर्चा आहे.
Raj Thackeray On Uddhav Thackeray : काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे हे नाशिकमध्ये मनसेच्या तीन दिवसीय शिबिरासाठी दाखल झाले आहेत. त्यावेळी अनौपचारिक गप्पा मारताना ते म्हणाले की, मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्यावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही. नोव्हेंबर – डिसेंबर दरम्यान चित्र स्पष्ट होईल. त्यांनतर युती संदर्भातील निर्णय बघू.
हिंदी सक्तीच्या बाबतील आताच्या सरकारने जीआर काढला होता. मागील सरकारने त्याचा अहवाल स्वीकारला होता, पण त्याचा जीआर काढला नव्हता, अंमलबजावणी केली नव्हती असं राज ठाकरे म्हणाले.