Ravindra Chavan Exclusive Interview : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्यास भाजपला आव्हान असणार का? प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं

Ravindra Chavan Exclusive Interview : आगामी निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर रवींद्र चव्हाण यांनी भाष्य केले आहे.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि आमची टीम ही संपूर्ण ताकदीने संघटनात्मक दृष्ट्या मजबूत कशी होईल? या दृष्टिकोनातून अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. या संघटन पर्वात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात भाजपचे विचारधारा जी राष्ट्रीयत्वाला धरून आहे, ती पोहोचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही केलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी जे काही आवश्यक आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा असल्याने भाजप आता राज ठाकरेंसोबतचा मैत्रीचा हात मागे घेणार का? असे विचारले असता रवींद्र चव्हाण म्हणाले की, राजकारणात काय कधी होईल? याची कल्पना नाही नसते. ठाकरेंचा विजयी मेळावा झाला आणि दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी दिलेले स्टेटमेंट होते की, कार्यकर्त्यांनी युतीच्या संदर्भात काहीही चर्चा करू नये. त्यामुळे प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक संघटना येणाऱ्या निवडणुकांकडे अत्यंत सावधपणे पाऊल टाकत असल्याचे त्यांनी म्हटले. रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, राज ठाकरे हे अतिशय समजदार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मुंबईच्या दृष्टिकोनातून जे जनतेचं हित आहे, त्या दृष्टिकोनातून दोघेही पावले उचलतील, असेही त्यांनी यावेळी म्हटले.