महाराष्ट्र

Mama Rajwade Sunil Bagul : भाजपची इमेज खराब होण्याचा धोका, फडणवीसांनी गिरीश महाजनांचा प्लॅन रद्द केला; मामा राजवाडे अन् बागुलांना बाहेरच ठेवलं

Mama Rajwade Sunil Bagul : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल (Sunil Bagul) व महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) यांचा गुरुवारी (दि. 03) भाजपमध्ये (BJP) प्रवेश होणार होता. मात्र, दोघांच्या पक्ष प्रवेशावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्स पोस्ट करुन भाजपवर टीकास्र सोडलं होतं. यानंतर मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा भाजप प्रवेश काल झाला नाही. आता मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा प्रवेश नेमका का लांबणीवर पडला? याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

मामा राजवाडे आणि सुनिल बागुल यांच्यावर मारहाणीसह इतर गंभीर गुन्हे दाखल झाल्याने दोन्ही नेते अडचणीत आले आहेत. दोघांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर दोन्ही नेते अद्याप फरार झाले. तर फरार असलेले राजवाडे आणि बागुल हे काल भाजपमध्ये प्रवेश करणार होते. गिरीश महाजन यांच्या माध्यमातून हे पक्ष प्रवेश होणार होते. मात्र अचानक मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा पक्ष प्रवेश थांबवण्यात आला.

जामीन झाल्यानंतरच पक्ष प्रवेशाचा निर्णय

आता मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असल्याने समाजात चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता असल्याने हा पक्ष प्रवेश लांबविण्यात आल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे प्रवेश थांबल्याची चर्चा आहे. आता सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा जामीन झाल्यानंतरच भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला जाणार आहे.

दोन्ही नेते ना भाजपचे ना ठाकरेंच्या शिवसेनेचे

तर दोन दिवसापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेने मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. दोन्ही नेते भाजपमध्ये जाण्याची चर्चा रंगताच शिवसेना ठाकरे गटातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. आता भाजपने देखील दोघांचे पक्ष प्रवेश थांबल्याने आता दोन्ही नेते ना भाजपचे ना ठाकरेंच्या शिवसेनेचे अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

प्रथमेश गितेंची नाशिक महानगरप्रमुखपदी नियुक्ती

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी एक्स पोस्ट करुन पक्ष विरोधी कारवाया केल्याने उपनेते सुनील बागुल यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती दिली होती. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. तर महागरप्रमुख पदावरुन मामा राजवाडे यांची हकालपट्टी करून उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने प्रथमेश गिते यांची नाशिक महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button