ठाकरे बंधुचं स्टेटमेंट चुकीचं नाही; 6 जुलैच्या मोर्चात सहभागी होण्याबाबत शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

माझ्यामते या सगळ्यांचा जो आग्रह आहे तो, प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीची करू नये असा आहे. 5 वीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही.
मुंबई : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सुत्रीचा अवलंब करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाला मनसेनं पहिल्यापासूनच तीव्र विरोध केला असून शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेऊन सरकारची भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकारची भूमिका आपणास मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मनसेची री ओढली असून हिंदीला विरोध नाही, पण पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले. आता, मराठी (Marathi), हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन राज-उद्धव या ठाकरे बंधुंच्या वक्तव्यावर आता शरद पवारांनी (Sharad pawar) आपली भूमिका मांडली आहे. ठाकरे बंधुंचं स्टेटमेंट चुकीचं नाही, असे शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, 6 जुलै रोजीच्या मोर्चातील सहभागावरही भाष्य केले.
माझ्यामते या सगळ्यांचा जो आग्रह आहे तो, प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीची करू नये असा आहे. 5 वीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही. देशातील एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो, त्यामुळे हिंदी भाषेला एकदमच साईडचं समजण्याचं कारण नाही. पण, लहान मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये किती भाषा ते आत्मसात करू शकतात. त्यांच्यावर किती भाषांचा लोड टाकावा लागेल याची देखील विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. दुसऱ्या भाषेचा लोड टाकला आणि मातृभाषा बाजुला पडली तर हे योग्य नाही, म्हणून 5 वी पर्यंतच्या हिंदी भाषेचा हट्ट सरकारने सोडावा, असा सल्लाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.