Pune Station : पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी, मेधा कुलकर्णींच्या प्रस्तावाला विरोध

Pune Station Name Change Controversy : पुणे स्टेशनला श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी केली होती. त्याला संभांजी ब्रिगेड आणि इतर संघटनांचा विरोध होत आहे.
पुणे : भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या पुणे स्टेशनच्या नामांतरणाच्या मागणीनंतर आता वाद पेटण्याची शक्यता आहे. पुणे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे असी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली. त्यांच्या या मागणीला संभाजी ब्रिगेडने विरोध केला असून पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
पुणे शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.त्यामुळे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव यांचे नाव देण्याची मागणी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. त्यावरुन आता वेगवेगळ्या मागण्या समोर येत असल्याचं चित्र आहे.
पुणे रेल्वे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव दिले पाहिजे अशी आपली पूर्वीपासूनची मागणी आहे. पुणे हे जगामध्ये विद्येचे माहेरघर म्हणून ओळखलं जातं ते कुणामुळे? महात्मा फुले यांनी ती ओळख निर्माण केली. आता आम्हाला आधुनिक पेशवाई अजिबात नको. पुण्याला, महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटावा असंच क्रांतिकारी काम महात्मा फुले यांनी केलं आहे. त्यामुले त्यांचं नाव पुणे रेल्वे स्टेशनला दिलं पाहिजे अशी मागणी संभीजी ब्रिगेडने केली आहे.
बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे, मेधा कुलकर्णींची मागणी
पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे. अशा प्रकारची मागणी अनेक संघटनांनी वेळोवेळी केली आहे. कुठल्याही रेल्वे स्थानकाचा, विमानतळाचा त्या ठिकाणच्या इतिहासाशी कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरून नागरिकांनाही आपला दैदिप्यमान इतिहास कळाला पाहिजे. परंतु पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही इतिहास त्यातून प्रतिबिंबित होत नाही. पुणे शहर हे मोठे आहे नावाजलेले आहे. ते राजधानीच्या शहरापेक्षा कमी नाही. शिक्षणाचे माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे, शैक्षणिक शहर आहे. आयटी हब आहे.त्यामुळे इतिहासाच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत. म्हणून पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे.
रिपब्लिकन खरात गटाचा विरोध
पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देऊ नये असं म्हणत रिपब्लिकन खरात गटाने मेधा कुलकर्णींच्या मागणीला विरोध केला. पुणे रेल्वे स्थानकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचेच नाव द्यावे अशी मागणी सचिन खरात यांनी केली.
सचिन खरात म्हणाले की, “पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. परंतु या नावाला आमचा विरोध आहे. कारण शिवाजी महाराजांनी राज्य चालविण्यासाठी जी राज्याभिषेक शक निर्माण केली होती, तीच राज्यभिषेक शक बंद केली. तसेच रयतेचे राजे शिवाजी महाराजांची समाधी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधली. शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा साजरी केली आणि याचा उल्लेख तत्कालीन वर्तमानपत्र दिनबंधू मध्ये आहे. तसेच त्यांनी स्त्री शिक्षणाचा यशस्वी लढा दिला. त्यामुळे आमचा पुणे रेल्वे स्थानकाला थोरला बाजीराव पेशवे नाव देण्यास विरोध आहे. पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे देण्यात यावे.”