Mumbai Crime Sathaye college: साठ्ये कॉलेजच्या इमारतीवरुन संध्या पाठकला ढकललं? कुटुंबीयांचा खळबळजनक आरोप, पोलिसांचा कसून तपास

Mumbai Vile Parle Crime: मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये 21 वर्षांच्या तरुणीनं महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Mumbai Vile Parle Crime: मुंबईच्या (Mumbai News) विलेपार्ले (Vile Parle) भागात स्थित साठ्ये कॉलेजमध्ये (Sathaye College) तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. संध्या पाठक असं या 21 वर्षांच्या मुलीचं नाव आहे. मुलीनं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलीस करत आहेत. तिच्या कुटुंबीयांना मात्र या मृत्यूबद्दल संशय व्यक्त आहे. संध्याला कुणीतरी तिसऱ्या मजल्यावरून धक्का दिला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला असं कुटुंबीयांना वाटतंय. महाविद्यालयानं मात्र ही आत्महत्याच असल्याचं सांगितलंय.
मुंबईच्या विलेपार्ले पूर्वेतील साठ्ये कॉलेज. मुंबई आणि उपनगरांतील महत्त्वाच्या महाविद्यालयाच्या यादीत याचा समावेश होतो. याच कॉलेजमध्ये आज सकाळी हादरवणारी घटना घडली. साठ्ये कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 21 वर्षीय मुलीनं कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केली. मृत मुलगी त्याच कॉलेजमध्ये थर्ड ईयरची विद्यार्थीनी होती. विद्यार्थीनीचा मृतदह आढळल्यानंतर कॉलेज प्रशासनानं तात्काळ तिच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. मात्र, आपल्या मुलीला कॉलेजच्या इमारतीवरुन कुणीतरी ढकलून दिल्याचा संशय तिच्या पालकांनी केला आहे.
21 वर्षांच्या संध्या पाठकनं नेमकी आत्महत्या केली की, ती तिसऱ्या मजल्यावरुन पडली की, तिला कुणी ढकलून दिलं? यांसारखे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर पोलिसांनी महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं, त्यामध्ये संध्या कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोअरमधून चालत जात असल्याचं दिसून आलं.
तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर संध्याला तातडीनं जवळच असलेल्या बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झालेला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
संध्या पाठक ही साठ्ये महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. संध्यानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तशा चर्चाही संपूर्ण कॉलेजमध्ये सुरू आहेत. पण, संध्यानं जर आत्महत्या केली असेल, तर तिनं एवढं मोठं टोकाचं पाऊल का उचललं? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. दरम्यान, पोलीस कसून तपास करत असून आता पोलीस तपासात काय समोर येतंय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.