20 वर्ष राजकारणात वर्चस्व गाजवणारा सर्वात मोठा नेता एकटा पडला; कोल्हापूरच्या राजकारणाची महाराष्ट्रात चर्चा
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर तब्बल 20 वर्षे पकड असलेले काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील जिल्ह्याच्या राजकारण एकाकी पडलेत. एकाकी पडल्याची कबुली स्वतःच बंटी पाटील यांनी दिली. बंटी पाटील यांच्या या वक्तव्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. कुणी मित्रत्वाचा सल्ला दिलाय. तर विरोधकांनी टोला लगावण्याची संधी साधली.
Maharashtra Politics : सत्तेच्या सारीपाटात कोण कधी केव्हा वरचढ ठरेल हे सांगता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात देखील तेच बघायला मिळत आहे. 20 ते 25 वर्ष कोल्हापूरच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणारे सतेज उर्फ बंटी पाटील जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडलेत. स्वतः बंटी पाटील यांनीच या बदललेल्या राजकीय परिस्थितीची कबुली दिली आहे.
जिल्ह्याच्या महत्वाच्या सत्ता केंद्रांवर बंटी पाटील आणि राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकहाती सत्ता होती. गोकुळच्या सत्तेतही दोन्ही नेते एकत्रच आहेत. मात्र बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे बंटी पाटील आणि हसन मुश्रीफांची वाट वेगळी झाली. तेव्हापासूनच बंटी पाटील यांच्या जिल्ह्याच्या राजकारणात घेरण्याची विरोधकांची रणनिती सुरू आहे. त्यामुळेच एकाकी पडल्याची भावना सतेज पाटील यांनी बोलून दाखवली. सतेज पाटील यांचे जिल्ह्याच्या राजकारणातले मित्र मंत्री हसन मुश्रीफ यांना महायुतीधर्म पाळावा लागत असल्याने ते शिवसेना आणि भाजपसोबत असल्याचं पाहायला मिळतंय. बंटी पाटील यांच्या या एकाकी पडल्याचा भावनेनंतर मुश्रीफ यांनी पाटील यांना मित्रत्वाचा सल्ला दिला.