महाराष्ट्र

कलेक्टर सकाळीच पायऱ्यावर येऊन बसले; 10 वाजेपर्यंत केवळ 3 कर्मचारी हजर, 30 जणांची पगारकपात

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी कार्यालयातील लेट लथीपांची चांगलीच हजेरी घेतल्याचं पाहायला मिळालं.

छ. संभाजीनगर : सरकारी काम अन् 6 महिने थांब अशी म्हणत प्रचलित आहे. कारण, सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाल फितीत कामे अडकवून ठेवण्याची पद्धत सर्रासपणे नागरिकांना त्रासदायक ठरते. अनेकदा कार्यालयीन वेळा न पाळणे, कार्यालयात वेळेत न येणे आणि लवकरच निघून जाण्याचे प्रकार घडतात. काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमधील महापालिकेत अधिकारी वेळेत न पोहोचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सकाळी 10 वाजता कार्यालयीन वेळेत पोहोचणे सरकारी कर्मचाऱ्यांना बंधनकारक असते. मात्र, आपल्याला कोण विचारतंय अशा अविर्भावात हे कर्मचारी वागतात. पण, (Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) आज उशिरा येणार्‍या कर्मचाऱ्यांचा स्वत: क्लास घेतला. चक्क हाती हेजरी रजिस्टर बुक घेऊन कलेक्टर साहेब स्वत: तहसील कार्यालयाच्या पायरीवर बसले होते. त्यांचा हा व्हिडिओ (Viral video) चांगलाच व्हायरल झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी कार्यालयातील लेट लथीपांची चांगलीच हजेरी घेतल्याचं पाहायला मिळालं. फुलंब्री येथील तहसील कार्यालयाच्या पायरीवर चक्क जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी खुर्चीवर बसून कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. यावेळी, सकाळी 10 वाजेपर्यंत केवळ तीनच कर्मचारी आले होते. त्यामुळे जोपर्यंत पूर्ण कर्मचारी येत नाहीत, तोपर्यंत हजेरी मस्टर घेऊन जिल्हाधिकारी  स्वतःच  पायऱ्यांवर बसले होते. पंचायत समिती अंतर्गत 40 कर्मचाऱ्यापैकी 10 कर्मचाऱ्यांची सकाळी दहा वाजता कार्यालयात उपस्थिती होती. तर भूमी अभिलेख, सहाय्यक निबंधक, पुरवठा विभाग, दारूबंदी विभाग, कृषी विभाग, या कार्यालयातील मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गैरहजेरी जिल्हाधिकाऱ्यांच्या मस्टरवर लागली. गैरहजर कर्मचाऱ्यांना एका दिवसाचा पगार कापण्यात येणार असून त्याची नोंद सर्व्हिस बुकमध्ये केली जाणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. तर, यावेळी, फुलंब्री कार्यालयात कामासाठी आलेल्या शेतकरी व नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधता त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. कलेक्टर महोदयांची ही धाड सरकारी कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनकपातीला कारणीभूत ठरली.

व्हिडिओ झाला व्हायरल

जिल्हाधिकारी महोदयांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून यातून इतर सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी धडा घ्यायला हवा, अशी चर्चा सोशल मीडियात होत आहे. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांबद्दलचा संतापही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आता तरी कर्मचाऱ्यांनी वेळेत पोहोचून नागरिकांची कामे मार्गी लावावीत, असाही सूर बोलला जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी स्वामी यांनी घेतलेल्या भूमिकेनं प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अनेक कर्मचाऱ्यांची झोड उडाल्याचं पाहायला मिळालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button