शरद आयटीआयमधील टाटा मोटर्सच्या पुल कॅम्पसमध्ये १५६ विद्यार्थ्यांची निवड
लक्ष प्रभा वृत्तसेवा जयसिंगपूर / यड्राव येथील सहकाररत्न शामरावजी पाटील यड्रावकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (शरद आयटीआय) येथे टाटा मोटर्स कंपनीचा पुल कॅम्पस इंटरव्ह्यु झाला. यामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ८ औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) कॉलेजमधील १६३ विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यामधील १५६ विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये शरद आयटीआयच्या ७२ विद्यार्थ्यांची निवड झाली. निवडलेल्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून जॉईनिंग लेटर देण्यात आले.
शरद आयटीआयमध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या या कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये इलेक्ट्रीशन, फिटर, मोटर मेकॅनिकल, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, पेंटर व शिटमेटल ट्रेडमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. कंपनीकडून विद्यार्थ्यांची कंपनीचे एचआर मॅनेंजर अभय निकम, ऋषिकेश गुड यांनी लेखी परिक्षा घेवून विद्यार्थ्यांची निवड केली.
शरद आयटीआयने आतापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांला नोकरी दिली आहे. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना उद्योग उभारण्यासाठी प्रोत्सहान व सहकार्य केले आहे. तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी शरद आयटीआय अग्रेसर राहिले आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्राचार्य आर.बी. भरमगोंडा, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. महावीर चौगुले यांच्यासह विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.