सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, रोहित पवार अन् जयंत पाटलांना राज्यात संधी; लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा

शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याच्या चर्चा जरी आज सुरू असल्या तरी ते कायम एकच होते.
सोलापूर : राज्यात एकीकडे दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman hake) यांनी मोठा दावा केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच असल्याचे सांगत त्यांनी सुप्रिया सुळेंना (Supriya sule) केंद्रात मंत्रिपद देण्यात येईल, असे भाकीतच केले आहे. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री तर जयंत पाटील आणि रोहित पवार यांना राज्यात मंत्री करायचे असल्याने याचा फटका छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर या ओबीसी नेत्यांना बसणार असल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. या 10 वर्षात पवार काका-पुतणे अमित शहांच्या दारात दिसत आहेत, अशी टीकाही हाके यांनी केली आहे. लक्ष्मण हाके यांनी मविआच्या नेत्यांवर टीका करताना, शरद पवार (sharad pawar), उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याच्या चर्चा जरी आज सुरू असल्या तरी ते कायम एकच होते. येत्या काळात केंद्रात सुप्रिया सुळे आणि राज्यात जयंत पाटील व रोहित पवार हे मंत्री झालेले दिसतील, असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. याचा थेट फटका छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर अशा राज्यातील ओबीसी नेत्यांना बसला असून भाजपने फक्त मते मिळविण्यासाठी त्यांचा वापर केल्याचा आरोपही हाके यांनी केला. रोहित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरी उत्सुक नसले तरी शरद पवार आणि अमित शहा, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचा निर्णय असल्याने फडणवीसही यात काहीही करू शकत नाहीत, असेही हाके यांनी म्हटले आहे.
शरद पवार कितीही फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेत असले तरी ते शहा आणि मोदी यांचेच कार्यकर्ते आहेत, त्यांनी कोणताही आव आणण्याच्या भानगडीत पडू नये असा टोलाही शरद पवार यांना लगावला. संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘स्वर्गातील नरक’ या पुस्तकात केलेला उल्लेख उलट असल्याचे निदर्शनास आणून दिले असता, ती परिस्थिती दहा वर्षांपूर्वीची असू शकेल. मात्र, आज दोन्ही पवार अमित शहांच्या दारात किती वेळा जातात हे महाराष्ट्राला माहिती आहे. हे पवार विमानाने जातात का अजून कशाने जातात, कुठे भेट घेतात हेही महाराष्ट्र जाणतो, असा शब्दात हाके यांनी पवार कुटुंबातील नेत्यांवर टीका केलीय. तर, खासदार संजय राऊत यांनी आता आत्मचिंतन करण्याची वेळ आल्याचेही हाके यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंनी पक्षाची लाईनच सोडली
उद्धव ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील पक्षाची लाईनच सोडल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या (OBC) गळ्यातील ताईत होता. मात्र, संजय राऊत यांनी शिवसेनेला शरद पवार यांच्या दावणीला नेऊन बांधल्याने वर्षानुवर्षे सोबत असलेला ओबीसी समाज शिवसेनेपासून दूर गेला. एकेकाळी 75 आमदार निवडून आणणाऱ्या सेनेवर आज किती वाईट वेळ आली, हे समोर दिसत असल्याचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची साथ सोडून पुन्हा शिवसेनेची मूळ लाईन पकडल्यास त्यांना सोन्याचे दिवस येतील, असा दावाही हाके यांनी केला आहे.