सीमेवर रक्षण करणारे व देशासाठी प्राण पणाला लावून लढणारे भारतीय जवान, देशाचे संपूर्ण सैन्यदल यांचा प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला अभिमान असून या सर्वांचे आपण ऋणी आहोत. आपल्या कर्तव्यदक्ष सैन्यदलाने दहशवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उध्वस्त करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले व त्यांच्या या पराक्रमाचे कौतुक करण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिरजेत आज तमाम राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.

पहलगाम येथे पाकिस्तानातील दहशवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला करून निष्पाप भारतीयांची हत्या केली. याचा बदला घेण्यासाठी भारताने ” ऑपरेशन सिंदूर ” आक्रमकपणे राबवून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले व दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली. या “ऑपरेशन सिंदूर ” मध्ये सहभागी होऊन पराक्रम करणाऱ्या भारतीय सोन्याच्या सन्मानार्थ रविवार दिनांक १८ रोजी मिरजेत भव्य अशी तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिकांनी या तिरंगा यात्रेस उदंड प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. हजारोच्या संख्येने नागरिक या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते.
मिरजेतील शिवतीर्थ येथून छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ माजी सैनिकाच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व ऑपरेशन सिंदूर मध्ये हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून मिरजेत तिरंगा यात्रेची सुरवात करण्यात आली. या तिरंगा यात्रेत देशासाठी सीमेवर लढलेले माजी सैनिक, शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय (आठवले गट), जनसुराज्य पार्टी, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, श्री शिव प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठा महासंघ, हिंदू एकता आंदोलन, संस्कार भारती, शिक्षक संघटना, रोटरी क्लब, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, सराफ असोसिएशन, रेशन दुकानदार असोसिएशन, आयएमए चे डॉक्टर्स, वकील असोसिएशन, महिला बचत गट, न्यू इंग्लिश स्कूल, मातोश्री तानूबाई खाडे इंग्लिश स्कुल, अल्फोन्सा स्कुल, विविध गणेशोत्सव मंडळे व नवरात्रोत्सव मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासह शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
देशभक्तीपर गीते वाजविणारा वाद्यवृंद, भारतमातेचे तैलचित्र असलेला रथ, एनसीसी च्या गणवेशातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, गणवेशात असलेले माजी सैनिक आणि हाती तिरंगा घेतलेले शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिक अशी भव्य तिरंगा यात्रा छ.शिवाजी चौक येथून गणेश तलाव, सराफ कट्टा, लक्ष्मी मार्केट, किसान चौक मार्गे शहर पोलीस ठाण्यासमोर आली व येथे तिरंगा यात्रेचा समारोप झाला. याठिकाणी हौतात्म्य पत्करलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सामूहिक वंदे मातरम म्हणून तिरंगा यात्रेची सांगता करण्यात आली.
या तिरंगा यात्रेत आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्यासह मकरंद भाऊ देशपांडे, प्रकाश मामा ढंग, दीपक बाबा शिंदे, समित दादा कदम, किरण रजपूत, श्वेत भैय्या कांबळे, सौ. सुमतीताई खाडे, सुशांत दादा खाडे यांचे सह हजारो राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.