गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग, अरुण डोंगळेंची बैठकीला दांडी, सतेज पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाले…

Satej Patil on Gokul Dudh Sangh : कोल्हापुरातील गोकुळ दुध संघावर सत्ता मिळवण्यासाठी शिंदे-फडणवीसांनी कंबर कसली आहे.
Satej Patil on Gokul Dudh Sangh , कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठ्या असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या (Gokul Dudh Sangh) राजकारणात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे आतापर्यंत गटातटाच्या राजकारणावर सुरू असणाऱ्या गोकुळच्या दुधाला राजकीय उकळी फुटली आहे. विद्यमान अध्यक्षांनी राजीनामा न देण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे कोल्हापुरातील (Kolhapur Politics) वातावरण आता चांगलं तापलं आहे. दरम्यान, याबाबत आता माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गोकुळ दुध संघावर काँग्रेस नेते सतेज पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे. अरुण डोंगळे आत्तापर्यंत अध्यक्ष होते. मात्र, आता महायुतीने सत्तापालट करण्यासाठी लक्ष घातल्यानंतर गोकुळचे विद्यमान अध्यक्ष असलेल्या अरुण डोंगळेंच्या भूमिकेमुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण आता चांगलं तापलंय. गोकुळ दुध संघाचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा न देण्याची भूमिका घेतली आहे.
गोकुळवर सत्ता मिळवण्यासाठी शिंदे-फडणवीसांची फिल्डिंग, अरुण डोंगळेंची महत्त्वाच्या बैठकीला दांडी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दुध संघात आयता अध्यक्ष घेऊन, महायुतीचे लेबल लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे पाय उतार होणारे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्याऐवजी गोकुळच्या बैठकीलाच दांडी मारून महायुतीची कटपुतळी होणे पसंत केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघातील सत्तेच्या चाव्या महायुतीकडे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांनी चांगलीच कंबर कसली असून विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे यांच्यासोबत मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर महायुतीचा अध्यक्ष करण्यासाठी नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. अध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानंतर डोंगळे यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिलाय.
सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ काय काय म्हणाले?
अरुण डोंगळे यांना आणखी एक वर्ष सत्ता हवी असून केवळ एका वर्षासाठी ते मुख्यमंत्र्यांना भेटले असावेत अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. तर अरुण डोंगळे यांना गोकुळच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीची हाव सुटली असून त्यांना ती खुर्ची सोडवेना, अशी टीका स्वतः मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. एकवेळ आमदारकी नको पण गोकुळचा संचालक करा अशी म्हण कोल्हापुरात रुजू आहे.
धनंजय महाडिक याबाबत बोलताना म्हणाले होते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये लक्ष घातलं आहे, असं मला वाटत नाही. हे जिल्ह्याच राजकारण आहे. फॉर्म्युल्यानुसार दोन दोन वर्ष ठरलं होतं. 15 मे पर्यंत अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा, अशी अपेक्षा होती अजून ही आहे. यामध्ये कोणतेही पक्षीय राजकारण नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती. गोकुळमध्ये मी आणि मुश्रीफ एकत्र आहोत. मात्र आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात आहोत सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसतं. हसन मुश्रीफ ,प्रकाश आबिटकर ,नरके हे सर्वजण महायुतीचे प्रमुख नेते आहेत.. त्यामुळे अरुण डोंगळे यांची एक वर्ष वाढीव अध्यक्ष राहण्याची इच्छा झाली असेल.