जरा याद करो कुर्बानी… जवान लक्ष्मण पवार यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार, भूमिपुत्रासाठी ग्रामस्थांचे डोळे पाणावले

माळशिरस तालुक्यातील गिरझणी (इलाक्षीदेवीनगर) येथील जवान पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा येथे भारतीय सैन्य दलात नायक रँक पदावर कर्तव्य बजावत होते.
सोलापूर : भारतीय सैन्य दलात पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा येथे कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेले जवान (martyr) लक्ष्मण संजय पवार यांच्या पार्थिवावर आज 16 मे रोजी गिरझणी येथील मूळग गावात (Solapur) अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात हजारोंच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी, जवान लक्ष्मण पवार अमर रहे.. भारत माता की जय… वंदे मातरमच्या घोषणांनी स्मशानभूमी परीसर दुमदुमून गेला होता. तर, जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बाणी हे गीत अंत्यसंस्कार मिरवणुकीत अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावत होते.
माळशिरस तालुक्यातील गिरझणी (इलाक्षीदेवीनगर) येथील जवान पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा येथे भारतीय सैन्य दलात नायक रँक पदावर कर्तव्य बजावत होते. यावेळी जवान लक्ष्मण संजय पवार (वय 33) यांचे 13 मे रोजी पश्चिम बंगाल येथे निधन झाले होते. आज शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता त्यांचे पार्थिव अकलूज येथे आणण्यात आले. अकलूजच्या महर्षी चौकापासून ते गिरझणीपर्यंत सजवलेल्या रथावर जवान लक्ष्मण पवार यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव ठेऊन अत्यदर्शन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी सैनिकांसह हजारो नागरीक सहभागी झाले होते. रस्त्यावर दुतर्फा उभे राहिलेल्या नागरिकांनी रथावर पुष्पवृष्टी करीत व पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. त्यानंतर जवान लक्ष्मण पवार यांचे पार्थिव राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी आई, वडील, भाऊ बहीण यांना शोक अनावर झाला होता. काही वेळ पार्थिव अत्यंदर्शनासाठी घरासमोरील उभारलेल्या मंडपात ठेवण्यात आले होते, त्यावेळी हजारो नागरिकांनी भूमीपुत्राचे अत्यंदर्शन घेत सॅल्यूट केला. राहत्या घरापासून अत्यंयात्रा काढून गिरझणी येथील स्मशानभूमीत जवान लक्ष्मण पवार यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान पवार यांचे बंधु विकी पवार यांनी चितेला अग्नी दिला. यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून बंदुकीचा 24 फेऱ्या हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. आजी, माजी आमदार विविध संस्थाचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांचेसह हजारो नागरिक जवानाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
दरम्यान, जवान पवार यांचे पार्थिव अकलूज येथे आल्यावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, बाजार समीतीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार राम सातपुते, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील,सुजयसिंह माने-पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. अत्यंदर्शन मिरवणूक शंकरनगर येथे आल्यावर सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, कार्य. संचालक राजेंद्र चौगुले व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. तर, माळशिरस तालुक्याचे आमदार
उत्तम जानकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, पो.नि.भानुदास निभोंरे, सैनिक कल्याण विभगा व माजी सैनिक संघ, यांनीही पुष्पचक्र अर्पण केले.