पाकड्यांशी लढताना ‘उरी’मध्ये मुरली नाईक शहीद; जत्रेसाठी गावी गेलेल्या आईचा टाहो, अमर रहेच्या घोषणा

मुरली नाईक हे मूळचे आंध प्रदेशातील, पण त्यांचे वडिल जगण्यासाठी मुंबईत आले. मुंबईतील घाटकोपर भागात मजुरीचे काम करुन त्यांनी लेकाला सैन्य दलात भरती होण्यापर्यंत शिक्षण दिले.
मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात युद्धाचे सायरन वाजले असून एअर स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यांनी सीमारेषेवर घणाघात सुरू असल्याचे दिसून येते. भारतीय वायू दलाने पाकिस्तानी सैन्याचे दोन विमाने पाडले असून त्यांच्या कारवायांना हवेतच नेस्तनाबूत केलंय. दुसरीकडे सीमारेषेवर तणावाचे वातावरण असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. पूँछ, उरी सेक्टरमध्ये पाकड्यांना भारतीय सैन्य (indian army) दलाकडून चोख प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे. मात्र, उरी सेक्टरमध्ये मुंबईतील मजूर बापाचा लेक जवान मुरली नाईक हे पाकिस्तान्यांशी लढताना शहीद (martyr) झाले आहेत. त्यांच्या वीरमरणाचे वृत्त गावी येताच, कुटुंबीयांनी टाहो फोडला. आपला तरणाबांड लेक गमावल्यानंतर आईच्या डोळ्यातील अश्रूंनी अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. मुरली नाईक शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या आंध्र प्रदेशातील मूळ गावी स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे. तर, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
मुरली नाईक हे मूळचे आंध प्रदेशातील, पण त्यांचे वडिल जगण्यासाठी मुंबईत आले. मुंबईतील घाटकोपर भागात मजुरीचे काम करुन त्यांनी लेकाला सैन्य दलात भरती होण्यापर्यंत शिक्षण दिले. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या 23 वर्षीय मुलाला वीरमरण आले. शहीद जवान मुरली श्रीराम नाईक, (वय 23 वर्षे) हे उरी, जम्मू काश्मीर येथे कर्तव्य करीत असताना आज 09 मे रोजी पहाटे 03:30 वाजता भारत पाकिस्तान युद्ध चालू असताना शहीद झाले आहेत. ते पंतनगर पोलीस ठाणे, मुंबई हद्दीतील सध्या चित्रा डेअरी जवळ, कामराज नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई या ठिकाणी राहणारे ते 2022 मध्ये भारतीय सेना दलामध्ये नोकरीस लागले होते. त्यांची ट्रेनिंग देवळाली, नाशिक येथे झाली होती, ते पहिल्यांदा आसाम येथे पोस्टिंगला होते, त्यानंतर ते पंजाब येथे तैनातीस असताना त्यांना युद्धा दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये उरी या ठिकाणी कर्तव्य देण्यात आले होते, त्या दरम्यान युद्धजन्य परिस्थितीत पाकड्यांशी लढताना जवान मुरली नाईक शहीद झाले आहेत. त्यांचे वडील श्रीराम नाईक व त्यांची आई ज्योती नाईक हे पंतनगर पोलीस ठाण्यातील चित्रा डेअरी जवळ, कामराज नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई या ठिकाणी राहावयास आहेत, त्याचे वडील श्रीराम नाईक हे मजुरीचा व्यवसाय करतात.
मुरली नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशातील असून सध्या ते त्यांच्या मूळ गावी कल्की तांडा, गोरंटाला मंडळा, जिल्हा सत्यसाई नगर, राज्य आंध्र प्रदेश या ठिकाणी यात्रा असल्याने 02 मे 2025 रोजी गेलेले आहेत. त्यामुळे, शहीद जवान यांचे प्रेत अंत्य विधिकारिता त्यांच्या मूळ गावी उद्या 10 मे रोजी सायंकाळी जाणार आहे, असे पंजाब येथील थलसेना कार्यालयातून त्यांना कळविण्यात आल्याची माहिती ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षकांनी दिली माहिती
शहीद जवान यांचे वडील श्रीराम नाईक यांच्या संपर्कात असून सदरची सर्व माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली आहे. शहीद जवान मुरली नाईक यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना, असे निवेदन मुंबईतील पंत नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांनी केले आहे.