महाराष्ट्र

शाहू महाराज… मी कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही, विकासकामात भेदभाव करत नाही: एकनाथ शिंदे

Eknath Shinde Jaysingpur Speech : विकासकामं करताना भेदभाव करु नका, जयसिंगपूरला निधी दिला आता कोल्हापूरलाही मोठा निधी द्या अशी मागणी खासदार छत्रपती शाहू महाराजांनी केली होती.

कोल्हापूर : विकासकामं करताना आपण कोणताही भेदभाव करत नाही, कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार छत्रपती शाहू महाराजांना दिला. जयसिंगपूरला जर दोन हजार कोटी रुपये देत असाल तर कोल्हापूरसाठीही त्यापेक्षा जास्त निधी दिला पाहिजे. विकासकामात भेदभाव करु नका असं खासदार शाहू महाराज म्हणाले होते. त्यावर एकनाथ शिंदेंनी आपण विकासकामात भेदभाव करत नसल्याचं सांगितलं. जयसिंगपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण (Jaysingpur Shivaji Maharaj Statue) एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज उपस्थित होते.

Shahu Maharaj Speech : काय म्हणाले शाहू महाराज? 

खासदार शाहू महाराज म्हणाले की, “महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. आज जयसिंगपूरसाठी महत्वाचा दिवस आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. राजर्षी शाहू महाराज यांनी हे जयसिंगपूर शहर स्थापन केलं. जयसिंगपूर शहरात नेहमीच आदर्श शहर ठरलं आहे, ते कायम राहणार. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्याने शहराच्या लौकिकात भर पडेल. जयसिंगपूरला दोन हजार कोटी निधी देणार असाल तर कोल्हापूरला त्यापेक्षा जास्त निधी दिला पाहिजे. विकासकामात कोणतंही राजकारण करू नये.”

विकासकामांत भेदभाव करणार नाही

शाहू महाराजांच्या नंतर भाषणाला उभे राहिलेले एकनाथ शिंदे म्हणाले की, “शाहू महाराज, मी विकासासाठी या हाताने दिलेले पैसे त्या हाताला कळू देत नाही. महाविकास आघाडीने अडीच वर्षात कोल्हापूरसाठी अडीच कोटी रुपये दिले होते. मी अडीच वर्षात 400 कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्याला दिले. मी कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही. मी विकासकामात भेदभाव करत नाही.”

एकनाथ शिंदे म्हणाले की, “राजर्षी शाहू महाराज यांनी हे शहर बसवलं आहे. इथले रस्ते 90 अशांचा कोनात तयार केले आहेत. हे मॉडेल शहर बघायला आले पाहिजे, तुम्हाला निधी कमी पडणार नाही. मी मुख्यमंत्री असताना कोणताही भेदभाव न करता निधी दिला. 300 बेडचे मेंटल हॉस्पिटल तयार केलं आहे. पण यामध्ये जयसिंगपूरकरांना जावं लागू नये. आमच्याकडे ठाण्याला देखील मेंटल हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी कधी कधी बेड बुक करून ठेवावा लागतो.”

शिवाजी महाराज आपले प्रेरणास्थान

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “राजर्षी शाहू महाराज यांनी स्थापन केलेल्या जयसिंगपूर नगरीत छत्रपतींचा पुतळा उभारला आहे. कितीही संकटं आली तरी धैर्याने, बुद्धीने संकटावर मात करता येते हे महाराजांनी दाखवून दिलं. मी मुख्यमंत्री असताना जम्मू काश्मीरमधील कुपवाडा इथं, भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. त्या पुतळ्याच्या तलवारीचे टोक पाकिस्तानच्या दिशेनं आहे. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहायचं नाही असा संदेश त्यातून दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे केवळ पुतळे नाहीत तर प्रेरणास्थान आहेत.

राज्यातील गडकोट किल्ल्यांचे जतन व्हायला पाहिजे यासाठी सरकार काम करतंय. जयसिंगपूर इथं सर्व काही काम झालं आहे, आनंद दिघे यांच्या नावाने पॅव्हेलियन होत आहे. पण सगळ्यात मोठं काम आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारून केलं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.

लाडक्या बहिणींनी दिलेला शब्द पूर्ण करणार

माझ्या लाडक्या बहिणींना सांगून ठेवतो. कुणी काहीही म्हटलं तरी ही योजना बंद होणार नाही. आम्ही दिलेला वचननामा पूर्ण करणार. आमची टीम आहे तीच आहे. आधी मी मुख्यमंत्री होतो. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला त्या खुर्चीवर बसवलं आहे. ज्या वेगाने काम केलं त्यापेक्षा दुप्पट वेगाने काम करणार असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button