देशाच्या पहिल्या नौदल प्रमुखांच्या लेकीचं हिमांशीला पत्र; तू, सैन्य अधिकाऱ्याची आदर्श पत्नी, तुझे धन्यवाद!

रामदास कटारी यांची कन्या ललिता रामदास यांनी हिमांशीला नरवाल हिला पत्र लिहून मला तुझा अभिमान असल्याचं म्हटलं.
मुंबई : पहलगाममधील दहशतवाद्यांच्या (Terrorist) भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देखील घटनेवर शोक व्यक्त करत दहशतवाद्यांना सोडणार नाही, अशा शब्दात इशारा दिलाय. या हल्ल्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवरुन व्हायरल झाले. त्यामध्ये, एका नौदलातील (Navy) अधिकाऱ्याच्या पत्नीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. नेव्हीतील (Navy) लेफ्टनंट विनय नरवाल यांना दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या, तेव्हा त्यांची पत्नी विनय यांच्या मृतदेहाशेजारीच बसून होती. मन हेलावून टाकणारे हे दृश्य पाहून देशभरातून संताप व्यक्त झाला. विशेष म्हणजे आपल्या पतीला नौदलाकडून मानवंदना देण्यात येत असताना पत्नी हिमांशी यांनी जय हिंद म्हणत श्रद्धांजली वाहिली, तो व्हिडिओ पाहून अनेकांच्या पोटात कालवलं. आता, हिमांशी यांचा आखणी एक व्हिडिओ समोर आला आहे, हा व्हिडिओ पाहून देशाच्या नौदलाचे पहिले प्रमुख अॅडमिरल रामदास कटारी यांच्या मुलीने हिमांशी यांना भावनिक पत्र लिहिलं आहे.
रामदास कटारी यांची कन्या ललिता रामदास यांनी हिमांशीला नरवाल हिला पत्र लिहून मला तुझा अभिमान असल्याचं म्हटलं. जेव्हा तू माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होती, तुझा तो व्हिडिओ पाहून मला तुझा गर्व वाटतो. तुझ्या अनन्यसाधारण धैर्य, दृढविश्वासाचा मला अभिमान वाटतो. मुस्लिम आणि काश्मिरी नागरिकांना काही जणांकडून लक्ष्य केले जात असल्यावरुन तू परखडपणे भूमिका मांडली. आजच्या काळात याचीच सर्वाधिक गरज आहे. हिमांशी सैन्य दलातील एका अधिकाऱ्याची आदर्श पत्नी आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे. लेखक परंजॉय गुहा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही चिठ्ठी शेअर केली आहे.
”सेवा, संविधान आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांच्या भावनांप्रति तूझं समर्पण प्रामाणिक आहे. तू अशी महिला आहे जी स्वत:च्या विचारांना समजू शकते. तू जे बोलली ते या देशातील विचारवंत नागरिकांच्या विचारांचा आणि भावनांचा आवाज आहे. तुझ्याकडून प्रेम आणि करुणा हा संदेश आम्ही सर्वांनी घेऊन शेअर केला पाहिजे, तुझे धन्यवाद हिमांशी!” अशी चिठ्ठी ललिता रामदास यांनी हिमांशीला लिहिली आहे.
हिमांशीने व्हिडिओत काय म्हटले.
पहलगाम हल्ल्यात भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना वीरमरण आले. 1 मे रोजी त्यांचा वाढदिवस होता, विनय नरवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबाने हरियाणातील करनाल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यावेळी, विनय यांच्या पत्नी हिमांशी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘संपूर्ण देशाने त्यांच्यासाठी (विनय) प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. ते कुठेही असले तरी ते निरोगी आणि आनंदी राहावे. “मला कोणाविरुद्धही द्वेष नको आहे, जे घडत आहे. लोक मुस्लिम किंवा काश्मिरींच्या विरोधात जात आहेत, आम्हाला हे नको आहे. आम्हाला शांती हवी आहे. अर्थात, आम्हाला न्याय हवा आहे, ज्यांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आज आम्ही सर्वजण विनयच्या स्मरणार्थ रक्तदान करत आहोत, असे शब्द हिमांशीचे होते, तिचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, हिमांशीने पती विनय यांच्या नावाने हातावर मेहंदी लावली होती