महाराष्ट्र ग्रामीण

कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन बच्चू कडूंचा प्रहार, ‘डीसीएम टू सीएम’ आंदोलनाची घोषणा, बारामतीतून सुरुवात तर नागपुरात शेवट

कर्जमाफीच्या मुद्द्यावर (loan waiver) प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. कडू यांनी पुढच्या महिन्यापासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Bacchu Kadu : कर्जमाफीच्या मुद्द्यावर (loan waiver) प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. कडू यांनी पुढच्या महिन्यापासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. बच्चू कडू यांनी ‘डीसीएम टू सीएम’ अशा आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनांतर्गत बच्चू कडू 2 जूनला बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर ‘अर्थसंकल्प वाचन आंदोलन’ करत त्यांना कर्जमाफीची आठवण करुन देणार आहेत. बारामतीत सुरु करणाऱ्या आंदोलनाचा शेवट नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करुन केला जाणार असल्याची माहिती कडू यांनी दिली आहे.

7 जुलैपासून तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या मोझरी इथं आमरण उपोषण करणार

अजित पवारांच्या घरासमोरील आंदोलनानंतर बच्चू कडू पुढे टप्प्याटप्याने पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. यात सर्वात शेवटी कर्जमाफीच्या मुद्द्यावर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी अकोल्यात आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावर 7 जुलैपासून तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकूंज मोझरी किंवा आपलं जन्मगाव असलेल्या कुरळपूर्णा येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

अजित पवारांवरही जोरदार टीका

दरम्यान, अजित पवारांनी कर्जमाफीचे आश्वासन आपण दिले नसल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचा राजकीय बाप असलेल्या भाजपचं कर्जमाफीचं वचन पूर्ण करणं ही अजित पवारांची जबाबदारी असल्याचं ते म्हणालेत. शेवटी बापानं दिलेलं वचन मुलालाच पुर्ण करावं लागतं असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावलाय.

सरकारला 100 दिवस झाले तरीही कर्जमाफी नाही

सरकारला 100 दिवस उलटून देखील शेतकरी कर्जमाफी बाबतीत सरकार निर्णय घेत नसल्याने प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (dcm Ajit Pawar) यांनी 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पैसे भरावे असं वक्तव्यही केलं होतं. यावरुनच प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, यामध्येसुद्धा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी या विषयाचा उल्लेख होता. तसेच महायुतीच्या नेत्यांनी देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी करु असं आश्वासनं दिलं होतं. मात्र, अद्यापही कर्जमाफीबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यामुळं शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button