Beed News : बीडमध्ये किती पाकिस्तानी नागरिक? पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून आकडेवारी जाहीर!

Beed News : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
Beed News : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी जारी केलेले 18 प्रकारचे व्हिसा 27 एप्रिलपासून रद्द करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने यापूर्वी दिलेली मुदत संपल्यानंतर एकही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये, याची खातरजमा करण्याचे आदेश अमित शाह यांनी दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली. राज्यातील 48 शहरांमध्ये एकूण 5,023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. बीडमध्ये (Beed) एकूण किती पाकिस्तानी नागरिक आहेत, याबाबत पोलीस अधीक्षक नवनीत कावत (Navneet Kanwat) यांच्याकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
बीडमध्ये किती पाकिस्तानी नागरिक?
बीड जिल्ह्यात अवैधरीत्या वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची तसेच बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. याच अनुषंगाने बीड पोलिसांनी जिल्ह्यात पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे तपासल्यानंतर अद्याप एकही नागरिक आढळून आलेला नाही. मात्र अवैधरित्या वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे आणि बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती बीड पोलिसांनी दिली आहे.
महाराष्ट्रात एकूण 5,023 पाकिस्तानी नागरिक
सध्या महाराष्ट्रात एकूण 5,023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. यामध्ये एक स्वतंत्र वर्ग ‘अनट्रेसेबल’ नागरिकांचा आहे. ज्यांचा व्हिसाचा वैध कालावधी संपलेला असूनही ते अद्याप भारतातच आहेत. या नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न भारतीय यंत्रणा करत आहेत, परंतु ते कुठे आहेत याचा ठाव लागलेला नाही, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. सार्क व्हिसा आणि शॉर्ट टर्म व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 28 एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैद्यकीय कारणांसाठी भारतात असलेल्या नागरिकांना दोन दिवसांची सवलत देण्यात आली असून त्यांना 30 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याची मुभा देण्यात आली आहे. तर नागपूर शहरात सर्वाधिक 2,458 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत. ठाणे शहरात 1,106 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचं समोर आलं आहे. यामधून फक्त 51 पाकिस्तान्यांकडेच वैध कागदपत्रं आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, महाराष्ट्रात दाखल झालेल्या 107 पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा सध्या सापडलेला नाही आणि ते बेपत्ता असल्याचं उघड झालं आहे.




