अजितदादा अन् शरद पवार 15 दिवसांत 4 वेळा भेटले
काका-पुतण्याचं मनोमिलन होणार? नेमकं घडतंय काय?
राज्याच्या राजकीय वर्तुळात एका ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे पुण्यात पवार काका-पुतण्यांची भेट झाली. गेल्या पंधरा दिवसात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये दोन वेळा भेट झाली आहे. सुरुवातीला शरद पवारांना केबिनमध्ये बसलेले पाहून अजित पवार परतले. त्यानंतर काही वेळाने साखर संकुलात कृषी क्षेत्रातील AI वापराबाबत बैठक झाली. या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसले. आधी शरद पवार केबिनमध्ये पोहोचले, पाठोपाठ अजित पवारांसह दोन अधिकारी आले. बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार आणि दोन अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक झाली. पवारांच्या केबिनमध्ये १५ ते २० मिनिटे स्वतंत्र बैठक सुरू होती. दरम्यान, गेल्या १५ दिवसांत वाढलेल्या भेटीगाठीवर अजित पवार यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, साखरपूडयाचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे. ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. त्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही तो पवार परिवाराचा आंतर्गत प्रश्न आहे. तर सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं, असं अजित पवार म्हणाले.