मोठी बातमी : अंबादास लय काड्या करतो, दानवेंची तक्रार घेऊन चंद्रकांत खैरे ‘मातोश्री’वर, ठाकरे मोठा निर्णय घेणार?

माजी खासदार चंद्रकांत खैरे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले असून आमदार अंबादास दानवे यांच्याबद्दल ते तक्रार करणार आहेत.
मुंबई : शिवसेना पक्षाच फूट पडल्यानंतर बहुतांश आमदार-खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली. त्यामध्ये, मराठवाड्यात ठाकरेंना मोठा धक्का बसला. मात्र, छ. संभाजीनगरमध्ये एकमेकांत शीतयुद्ध असलेल्या शिवसेना नेत्यांनी ठाकरेंसोबत राहणेच पसंत केले. माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) आणि आमदार अंबादास दानवे हे दोन नेते ठाकरेंच्या शिवसेनेत राहिले. मात्र, एकत्र असले तरी त्यांच्यातील मतभेद समोर येत आहेत. संभाजीनगरमधील एका कार्यक्रमाला चंद्रकांत खैरे यांना निमंत्रण नि दिल्याने त्यांनी संताप व्यक्त करत, अंबादास काड्या करतो, त्याची तक्रार मातोश्रीवर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, आज लगेच ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
माजी खासदार चंद्रकांत खैरे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले असून आमदार अंबादास दानवे यांच्याबद्दल ते तक्रार करणार आहेत. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात सुरू असलेल्या वादा नंतर खैरे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाल्याने दोघांमध्ये नेमकं काय चर्चा होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात वाद सुरू असताना आपण अंबादास दानवे यांची तक्रार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे खैरा यांनी सांगितलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची ते भेट घेत असल्याचं कळतंय. तर पक्षप्रमुखांकडे जरी खैरे तक्रार करत असतील तर पक्षप्रमुख जे बोलतील त्या सूचना पाळू अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली आहे.
मेळाव्याला न बोलवल्यावरुन वाद
शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. दोघांकडूनही एकमेकांवर टीका करण्यात येत असल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मागील आठवड्यात अंबादास दानवे यांनी बोलवलेल्या पक्षाच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरे हे उपस्थित न राहिल्याने पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. आपल्याला मेळाव्याला बोलवण्यात आलंच नव्हतं, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. तसेच आपल्याला मेळाव्याला बोलवण्यात आलं नाही, त्यामुळे याबाबत आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं होतं. तर, संभाजीनगरमध्ये मी शिवसेना वाढवली, अंबादास मागून आलाय. मात्र, अंबादास काड्या करतो, असेही खैरे यांनी स्पष्टपणे म्हटले होते.