PM Modi in Nagpur : नागपुरातील संघाच्या स्मृती मंदिराला भेट देणारे मोदी दुसरे पंतप्रधान; तर पहिले PM कोण?

देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होणारे मोदी हे नागपूरच्या संघस्थानी जाणारे पहिलेच पंतप्रधान असल्याची चर्चा रंगलीय. मात्र पंतप्रधान असताना भेट देणारे मोदी पहिले नव्हे तर दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत.
नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे गुढीपाडव्याला नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन (Dr. Hedgewar Smarak) परिसरात भेट देणार असून त्यावेळी संघाचे विद्यमान सरसंचालक डॉ. मोहन भागवत हेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. संघाचे शताब्दी वर्ष सुरु असताना पंतप्रधानाच्या या दौर्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी डॉ.हेडगेवार स्मारक समिती व प्रशासन यांची जय्यत तयारी सुरु आहे.
दरम्यान, देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होणारे मोदी हे नागपूरच्या संघस्थानी जाणारे पहिलेच पंतप्रधान असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र संघाच्या हेडगेवार स्मृती भवन परिसराला पंतप्रधान असताना भेट देणारे मोदी पहिले नव्हे तर दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत.
स्मृती मंदिराला भेट देणारे पहिले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
नरेंद्र मोदी यांच्या आधी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 27 ऑगस्ट 2000 रोजी रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती भवन परिसरात पोहोचले होते. तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन त्यावेळी त्यांच्यासोबत होते. मुळात तेव्हा नागपुरात भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन होते आणि त्यानिमित्ताने भाजपची सर्व दिग्गज नेते मंडळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाली होती. त्याच वेळेस अधिवेशनातून वेळ काढून पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी संघाच्या हेडगेवार स्मृती भवन परिसरात गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेत त्यांच्या स्मृतीला पुष्पांजली वाहिली होती.
विशेष म्हणजे त्यावेळेस जेष्ठ स्वंयसेवक आणि अटल बिहारी वाजपेयी यांना गुरुतुल्य असलेल्या नारायण तरटे यांचीही अटल बिहारी यांच्यासोबत भेट झाली होती. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी दीक्षाभूमीला जात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीलाही वंदन केले होते.
पंतप्रधानांच्या दौऱ्यात मेट्रो रेल सेवा बजावणार महत्त्वाची भूमिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी मेट्रो रेल सेवा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. माधव नेत्रालयाचा कार्यक्रम नागपूर-हिंगणा रोडवर वासुदेव नगर परिसरात आहे. वासुदेव नगर मेट्रो स्टेशनच्या अगदी समोर हा कार्यक्रम असल्याने नागपुर शहरातून येणाऱ्या निमंत्रितांनी मेट्रोचा वापर करावा, स्वतःच्या वाहनातून कार्यक्रम स्थळी येऊ नये, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पंतप्रधानांचा दौरा असल्यामुळे पोलिसांकडून चौका चौकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार असून अनेक ठिकाणी वाहतूक नियंत्रित केली जाईल आणि वळवली ही जाईल. त्यामुळे स्वतःच्या वाहनातून येणाऱ्यांना अनेक त्रासांना सामोरे जावं लागू शकतो, म्हणून कार्यक्रम स्थळ पासून अगदी हाकेच्या अंतरावर मेट्रो स्टेशन असल्यामुळे निमंत्रितांनी मेट्रोच्या माध्यमातून कार्यक्रम स्थळी पोहोचावं, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान माधव नेत्रालयाचे कार्यक्रमात स्वतःच्या वाहनाने जाण्यापेक्षा लोकांनी जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करावा, यासाठी मेट्रो प्रशासनाने ही त्या मार्गावर उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत दर आठ मिनिटांनी मेट्रोची सेवा देण्याचे ठरविले आहे..