लागतंय, मनात काही काळं ठेऊ नको’; संजय राऊतांनी फोन केल्याचा म्हस्केंचा दावा

Naresh Mhaske on Sanjay Raut : एकनाथ शिंदेंना ऊर्जा देऊ नका, हा माणूस घात करेल हे सांगणारे ठाण्यातील लोक त्यांच्याच अवतीभोवती आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. यावर नरेश म्हस्केंनी मोठा दावा केलाय.
Naresh Mhaske on Sanjay Raut : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सर्वात जास्त ऊर्जा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच दिली आहे, अशी ऊर्जा त्यांना देऊ नका हा माणूस घात करेल असे सांगणारी लोकं आज त्यांच्याच आवतीभोवती ठाण्यात आहेत. आताचे ठाण्यातील खासदार-आमदार आहेत, त्यांनीच उद्धव ठाकरेंना म्हटले होते की, साहेब हा माणूस तुम्हाला धोका देईल, यांची नियत चांगली नाही, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. आता ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी संजय राऊत यांनीच आपल्याला फोन केल्याचा दावा केलाय.
नरेश म्हस्के म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही रोज मला फोन करत होतात. एकनाथला सांग, मला नाईलाजाने यांच्यासोबत राहावे लागत आहे. पण, माझ्याबद्दल मनात काही काळं ठेवू नको, हे तुम्ही मला स्वत: फोन करुन सांगत होतात. विसरलात का? असा पलटवार त्यांनी संजय राऊत यांच्यावर केलाय. तर ही बंद मूठ उघडली तर तुम्हालाच भारी पडेल, असा इशारा देखील त्यांनी संजय राऊतांना दिला आहे.
बाळासाहेबांना अखेरच्या दिवसांत त्यांनी त्रास दिलाच, पण…
नरेश म्हस्के पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली, त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. मला भेटायला ये असे सांगितले होते. त्या दिवशीही आम्ही एकनाथ शिंदेंसोबत आहोत, भेटायला येणार नाही, असे आम्ही सांगितले होते. शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली, आम्ही त्यांच्या सोबतच आहोत, असेही त्यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की, बाळासाहेबांना शेवटच्या दिवसांत त्यांनी किती त्रास दिला, हे सगळ्यांना माहित आहे. राज ठाकरे त्याबाबत अनेकदा बोलले आहेत. औरंगजेबाने सत्तेसाठी आपल्या भावांचा काटा काढला. उद्धव ठाकरे यांनी वेगळं काय केलं? आपल्या सख्ख्या भावांना त्यांनी पद्धतशीरपणे दूर केले. बाळासाहेबांची वैचारीक संपत्ती त्यांनी सोडली . पण इतर प्रॉपर्टीसाठी भावासोबत दावा मांडला. हा दावा कोर्टात गेला. बाळासाहेबांना अखेरच्या दिवसांत त्यांनी त्रास दिलाच पण त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या दुष्मनांशी हातमिळवणी करून आताही यातना देत आहेत, असा घणाघात देखील नरेश म्हस्के यांनी केलाय.