महाराष्ट्र

Devendra Fadnavis on Kunal Kamra: एकनाथ शिंदेंकडे बाळासाहेबांचा वारसा, जनतेमध्ये त्यांना प्रचंड आदर; देवेंद्र फडणवीसांनी कुणाल कामराला फटकारलं, म्हणाले…

Kunal Kamra standup on Eknath Shinde: कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्याविषयी एक विडंबनात्मक गीत सादर केले होते. यामध्ये त्यांना गद्दार, दलबदलू अशा उपमा देण्यात आल्या आहेत.

मुंबई: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिप्पणी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीच्या नेत्यांनी कुणाल कामराविरोधात (Kunal Kamra) टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कुणाल कामराच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. खरं म्हणजे कामराला माहिती पाहिजे की, महाराष्ट्राच्या जनतेने 2024 साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार, हे दाखवून दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांची विरासत कोणाकडे गेली, हे जनतेने ठरवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याविषयी अशाप्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी जनतेच्या मनात आदर आहे. त्याचा अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही. व्यंग करा पण कोणालाही अपमानित करुन नका. कोणीही अपमानित करण्याचं काम काम केले तर ते सहन केले जाणार नाही. त्यामुळे कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांची माफी मागावी. कुणाल कामरा संविधानाचं जे पुस्तक दाखवत आहेत, ते त्यांनी वाचलेलं नाही. संविधानात लिहलं आहे की, स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता येणार नाही. त्यामुळे कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची माफी मागितली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मोहित कंबोज यांचा इशारा

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक काव्यानंतर कुणाल कामरा याला इशारा दिला आहे. अभी तो सिर्फ स्टूडियो टूटा है , पिक्चर तो अभी बाक़ी है दोस्त. सभी शिव सैनिको को दिल से अभिनंदन और जय श्री राम, असा सूचक इशारा मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

कामरा पाँडिचेरीत, त्याला अटक करायला पोलिसांची मदत घेऊ: प्रताप सरनाईक

खारच्या शिवसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कुणाल कामरा विकृत आहे. संविधानाची प्रत घेऊन तो संविधानाने अधिकार दिल्याचे भासवत आहे. प्रशांत कोरटकर सारखा माणून जर संविधान घेऊन उभा राहिला तर मान्य करणार का? कामरा पाँडिचेरीला पळाला आहे, त्याला अटक करण्यासाठी तिथल्या पोलिसांची मदत घेऊ. आम्ही कुठल्याही तोडफोडीचे समर्थन करणार नाही. मुंबईतील शांत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. कुणाल कामरा याच्यावर गुन्ह्यातील४२७ कलम लावण्यात आले आहे, त्यात अनेक पोट कलमं आहेत, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button