महाराष्ट्र

Maharashtra Vidhan Parishad Election 2025: विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे हिरमुसल्या, म्हणाल्या, ‘जो चाह थी मेरी, वो मुझे नहीं मिली’

Vidhan Parishad Election 2025: विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे. या जागेसाठी शिवसेनेत अनेकजण इच्छूक होते.

मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी येत्या 27 मार्चला होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election 2025) एकूण पाच जागांपैकी तीन जागांवर भाजप आणि प्रत्येकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा उमेदवार उभा राहणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडून एकमात्र जागेवर चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे. या जागेसाठी शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) आणि संजय मोरे यांच्या नावांचीही चर्चा होती. इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने एकनाथ शिंदे यांनी शेवटपर्यंत उमेदवाराचे नाव जाहीर करणे टाळले होते. सोमवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास उरले असताना एकनाथ शिंदे यांच्याकडून चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छूक असलेल्या शीतल म्हात्रे काहीशा नाराज झाल्या.

शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर स्टेटस शेअर करुन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर एक शायरी शेअर केली आहे. या शायरीतून शीतल म्हात्रे विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे काहीशा निराश झाल्याचे दिसत आहे. मात्र, राजकीय जीवनात आणखी संघर्ष करण्याची आपली तयारी असल्याचे संकेतही शीतल म्हात्रे यांनी दिले आहेत.

मंज़िलें अभी और भी हैं
चलना अभी दूर तक और भी है।

जो चाह थी मेरी
वो मुझे नहीं मिली,
पर जो कुछ भी मिला
वो किसी स्वपन देखी चाह
से कम भी नहीं…

अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी कोणाला उमेदवारी?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या एकमेव जागेवर संजय खोडके (Sanjay Khodke) यांना उमेदवारी देऊ केली आहे. संजय खोडके हे विदर्भातील पक्षाचे मोठे नेते असून ते आमदार सुलभा खोडके यांचे पती आहे. त्यामुळे आगामी काळात विधान भवनात पती-पत्नी आमदार पाहायला मिळणार आहेत.

भाजपकडून कोणत्या तीन चेहऱ्यांना विधानपरिषेदत संधी?

भाजपने विधानपरिषदेच्या तीन जागांवर पक्षाच्या निष्ठावंत नेत्यांना संधी दिली आहे. त्यामध्ये दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांचा समावेश आहे. भाजपकडून यावेळी ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांना विधानपरिषदेवर पाठवले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, नेहमीप्रमाणे ही अपेक्षा फोल ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button