महाराष्ट्र

Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांची आझाद मैदानात भेट घेतल्यानंतर अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव आणला आणि राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.

Shaktipeeth Expressway : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये 12 जिल्ह्यातील शेतकरी एकवटले. यावेळी हजारो शेतकऱ्यांनी निर्धाराने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा नारा दिला. दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांची आझाद मैदानात भेट घेतल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव आणला आणि राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.

शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे, मात्र, लादायचा नाही 

स्थगन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेमध्ये सहभाग घेत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे. मात्र, लादायचा नाही. याबाबत शासनाची स्पष्ट भूमिका आहे. बंटी पाटील यांच्यासोबत कोल्हापूर विमानतळावर शेतकरी प्रतीक्षा करत होते. तेव्हा ते शेतकरी या मार्गाला विरोध करत नव्हते. त्यांनी सह्यांचे निवेदन आम्हाला दिला आहे. त्यामध्ये एकही सही खोटी असली, तरी त्यांनी कारवाई करावी असे सांगितल्याचे ते म्हणाले.

समृद्धी महामार्गामुळे 12 जिल्ह्यातील जीवन बदलले

त्यांनी सांगितले की शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांमध्ये चित्र बदलणार आहे. शेतकऱ्यांना महामार्ग हवा आहे. समृद्धी महामार्गामुळे 12 जिल्ह्यातील जीवन बदलले, तसेच या महामार्गाने देखील जीवन बदलणार असल्याचे ते म्हणाले. आज जसा मोर्चा आला आहे तसाच तिप्पट कार्यक्रम हा मार्ग होण्यासाठी होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्या गावांमध्ये सभा झाल्या त्या गावांमध्ये शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. जमिनीच्या पाचपट भाव दिल्याचे ते म्हणाले. यामध्ये विरोधकांनी देखील मदत करावी असे ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आंदोलनात सहभागी होऊन विधानपरिषदेत पोहोचलेल्या आमदार सतेज पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. हा मार्ग नागपूर रत्नागिरी महामार्गाला जोडू शकतो, पण तो आधीच रस्ता असल्याचे ते म्हणाले. थोडा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आज महाराष्ट्रामधील शेतकरी आझाद मैदान जमले आहेत.त्यांची संख्या थोडी असली तरी त्यामधील पाच पन्नास शेतकऱ्यांना बोलवून मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका समजावून घेतली पाहिजे, अशी विनंती पाटील यांनी केली. ज्यांनी तुम्हाला परवानगी दिली आहे तेच पहिले विरोध करत होते, त्यामुळे याचा फेरविचार करावा आणि ज्यांनी सह्यांचे निवेदन दिले आहे ते निवेदन आमच्याकडे द्यावे अशी मागणी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

आझाद मैदानात शेतकरी एकवटले

दरम्यान, आज आझाद मैदानात शक्तीपीठ महामार्गाविरोधात एकवटले. कोल्हापूरसांगलीसह विरोध असणाऱ्या 12 जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीमधील नेते आझाद मैदानात पोहोचले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button