Alien Enemies Act of 1798 अमेरिकेत ज्यांना नागरिकता मिळाली त्यांना सुद्धा हद्दपार करणार, डोनाल्ड ट्रम्प तब्बल 227 वर्षांपूर्वीचा कायदा आणत सर्वात खतरनाक खेळाच्या तयारीत!

Alien Enemies Act of 1798 : 2024 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर अवैध स्थलांतरितांना देशातून बाहेर काढू, असे अनेकवेळा सांगितले होते. एलियन एनिमीज कायदा लागू करण्याची घोषणाही केली होती.
Alien Enemies Act of 1798 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यांनी देशाची सत्ता हाती घेतल्यापासून व्हेनेझुएला, भारत, ब्राझील, मेक्सिकोसह अनेक देशांतील हजारो लोकांना साखळदंडात बांधून लष्करी विमानातून हद्दपार केले आहे. आता असे सांगण्यात येत आहे की ट्रम्प 227 वर्षे जुना कायदा आणण्याच्या तयारीत आहेत, ज्यामुळे प्रत्येक गैर-अमेरिकन व्यक्तीला बाहेर काढण्याचा धोका आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा कायदा लागू केल्यास अमेरिकेसह संपूर्ण जगात खळबळ उडेल.
एलियन एनिमी अॅक्ट, 1798 बद्दल जाणून घेऊया
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत 1798 मध्ये बनवलेला हा कायदा पुन्हा लागू करू इच्छितात. हा कायदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना युद्धकालीन अधिकार देतो. या अंतर्गत राष्ट्रहिताच्या नावाखाली राष्ट्रपती कोणत्याही गैर-अमेरिकन नागरिकाला देशातून बाहेर काढू शकतात. हा कायदा युद्धकाळासाठी असला तरी आता डोनाल्ड ट्रम्प यांना सामान्य परिस्थितीतही त्याची अंमलबजावणी करायची आहे.
या 227 वर्षांचा कायदा काय म्हणतो?
अमेरिकेचा हा 227 वर्ष जुना कायदा सांगतो की, जेव्हा जेव्हा अमेरिका आणि इतर कोणत्याही देशामध्ये युद्ध होईल तेव्हा राष्ट्राध्यक्षांना गैर-अमेरिकन वंशाच्या लोकांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असेल. विशेषत: ते 14 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांबाबत निर्णय घेऊ शकतात आणि त्यांना देशातून हद्दपारही केले जाऊ शकते. या कायद्यानुसार बाहेर काढल्या जाणाऱ्या लोकांना ‘शत्रू एलियन’ घोषित केले जाऊ शकते.
निवडणूक प्रचारादरम्यानही ट्रम्प अवैध स्थलांतरितांबाबत आक्रमक
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुन्हा एकदा सामान्य परिस्थितीत 18व्या शतकातील हा कायदा लागू करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेत याची जोरदार चर्चा आहे. मात्र, अमेरिकेवर कोणत्याही देशाकडून हल्ला झालेला नसताना ट्रम्प यांना या कायद्याची अंमलबजावणी करणे कठीण जाईल, असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. 2024 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर अवैध स्थलांतरितांना देशातून बाहेर काढू, असे अनेकवेळा सांगितले होते. याशिवाय त्यांनी एलियन एनिमीज कायदा लागू करण्याची घोषणाही केली होती.