महाराष्ट्र

मोठी बातमी : शरद पवार-अजित पवारांची भेट, नवं कारण समोर, Y B सेंटरमधील भेटीने राजकारण ढवळलं

शरद पवार आणि अजित पवार यांची मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे भेट झाल्याची माहिती आहे. आजच सायंकाळी 5 वाजता काका-पुतणे भेटले असून भेटीचं प्रमुख कारण अद्याप गुलदस्त्यात आहे

मुंबई : राज्यात एकीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन्ही प्रमुख नेते एकमेकांना भेटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जाऊन शरद पवारांची (Sharad pawar) भेट घेतली. माळेगाव साखर कारखान्याची सर्वसाधारण वार्षिक सभेची तारीख आणि वेळ ठरवण्यासाठी ही भेट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर प्रथमच दोन्ही नेते एकत्र आले असून त्यांच्यात 1 तास चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आणि राजकीय चर्चा देखील दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याची शक्यता नाकारता येत नाहीत.

शरद पवार आणि अजित पवार यांची मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे भेट झाल्याची माहिती आहे. आजच सायंकाळी 5 वाजता काका-पुतणे भेटले असून भेटीचं प्रमुख कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात प्रत्यक्षपणे झालेली ही पहिलीच भेट आहे. कारण, यापूर्वी काहीवेळा शरद पवार आणि अजित पवार भेटले होते, पण ते कुठल्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा एखाद्या संस्थेच्या बैठकीसंदर्भाने भेटले होते. मात्र, आज चक्क काका आणि पुतण्या यांच्यात ठरवून भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवारांसोबत तासभर चर्चा (Sharad pawar ajit pawar meeting)

दरम्यान, शरद पवार मागील 2 दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे, मागच्या 2 दिवसांतील सगळ्या भेटी त्यांनी रद्द केल्या होत्या. शरद पवार आज सकाळपासून सिल्व्हर ओकला होते. मात्र, संध्याकाळी 5 वाजता ते वाय.बी. चव्हाण सेंटर येथे आले आणि त्यानंतर अजित पवार त्याठिकाणी आले. या दोन्ही नेत्यांमध्ये येथे तब्बल 1 तास चर्चा झाली आहे. त्यामुळे, आगामी राजकीय बदलाचे वारे वाहत आहेत का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या भेटीचं स्वागत केलं आहे. दोन वरिष्ठ नेते भेटले तर त्यात गैर नाही, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसदर्भाने, सामाजिक विषयाच्या अनुषंगाने ही भेट झाली असावी. महाराष्ट्राच्या विकासासाठीच ही भेट झाली असावी, अशी प्रतिक्रिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button