12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची व्यथा दाखवल्यावर सरकारचा निर्णय

इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
Maharashtra Floods : इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. एबीपी माझानं पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची व्यथा दाखवल्यावर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना सूचना दिल्या आहेत.
कोणत्याही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून निर्णय
कोणत्याही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी दादा भुसे यांनी दिली आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यथा मांडली होती. यानंतर सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळं 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
नेमकं काय म्हणाले मंत्री शिक्षणमंत्री दादा भुसे?
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन येऊन गेला आहे. त्यानुसार 12 वी च्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढवली असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे. शाळा इमारतीच्या नुकसान यावर लक्ष ठेऊन आहे. कार्यवाही करु. पुढच्या आठवड्यात राज्यभरातील अहवाल घेऊन निर्णय घेतला जाईल अशी माहिती दाद भुसे यांनी दिली.
राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पूरस्थिती
राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी नद्यांना नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जवळपास 20 जिल्ह्यांत, त्यातही विशेषत: मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत पाऊस आणि महापुराने सर्वसामान्यांचे जगणे उद्ध्वस्त केले. शेती, पिके, घरेदारे, गुरेढोरे सगळे काही वाहून गेले. अत्यंत निगुतीने उभा केलेला संसार एका पावसाने मोडून पडला. पावसाने काही तासांत होत्याचे नव्हते झाले. शाळकरी आणि महाविद्यालयीन पोरांची वह्या, पुस्तके, दफ्तरं सगळं वाहून गेलंय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी 12 वी चे अर्ज भरायला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं 12 वी च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.




