Ind Vs Pak Asia Cup: संजय राऊतांनी भारत-पाक सामन्यावरुन रान उठवलं, पण उद्धव ठाकरेंचा एकेकाळचा राईट हँड असणाऱ्या नेत्याला मोह आवरला नाही, नेमकं काय घडलं?

Ind Vs Pak Asia Cup: आशिया कप 2025 च्या भारत पाकिस्तान सामन्यांवरून शिवसेना ठाकरे गटाने टीकेची झोड उठवली होती.
Ind Vs Pak Asia Cup: आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने (India) चुरशीच्या लढतीत पाकिस्तानचा (Pakistan) दारूण पराभव केला. अंतिम सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली असतानाही तळ ठोकून खेळलेल्या तिलक वर्माच्या नाबाद 69 धावांच्या अर्धशतकी खेळीने विजय भारताच्या झोळीत टाकला. सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार ठरला. या विजयामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भारतीय संघाचे कौतुक होत आहे. मात्र सामन्यापूर्वी आणि त्यादरम्यान झालेल्या राजकीय घडामोडींमुळे या विजयाला वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे.
ठाकरे गटाचा विरोध, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल (Uddhav Thackeray on IND vs PAK Asia Cup)
भारताने पाकिस्तानसोबत आशिया कपमध्ये एकूण तीन सामने खेळले. या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले. हे पाऊल ‘पहगाम हल्ल्याच्या निषेधार्थ’ असल्याचं सांगण्यात आलं. मात्र या सामन्यांवरून शिवसेना ठाकरे गटाने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यावर निशाणा साधत म्हटलं की, “जय शाहच्या हट्टापायी भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळावा लागतो, यातून भाजपच्या राष्ट्रभक्तीचं ढोंग उघडं पडलं आहे. आपण पाकिस्तानवर दहशतवादाचे आरोप करतो आणि नंतर त्यांच्याचसोबत क्रिकेट खेळतो, ही द्विधा भूमिका आहे. आपण जर या स्पर्धेत सहभागी झालो नसतो, तरही काही बिघडलं नसतं,” असे त्यांनी म्हटले.
संजय राऊत यांची टीम इंडियावर ‘नौटंकी’ टिप्पणी (Sanjay Raut on IND vs PAK Asia Cup)
विजयानंतरही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीकास्त्र सोडताना टीम इंडियावर निशाणा साधला. “पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं, ही लोकभावना आहे. राष्ट्रभक्त नागरिकांनी हा सामना पाहिलाच नाही,” असं त्यांनी म्हटलं. तर काल तुम्ही मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी घ्यायला नकार दिलात, पण सामना खेळलात ना. 15 दिवसांपूर्वी याच मोहसीन नक्वीसोबत फोटोही काढले, हस्तांदोलनही केलं. मग देशाला मूर्ख समजता का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.



