Vande Bharat Express : नांदेड मुंबई प्रवास अवघ्या साडे नऊ तासात, वंदे भारत एक्सप्रेस सुरु, ट्रेनचं वेळापत्रक अन् तिकीट दर जाणून घ्या

Vande Bharat Express : नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
नांदेड/ मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेसचा (विस्तारित) हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ (ऑनलाईन). यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व इतर मान्यवर उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना अशी वंदे भारत एक्सप्रेस यापूर्वी धावत होती. या सेवेचा विस्तार करण्यात आला असून आजपासून नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. याचा उद्घाटन सोहळा पार पडला.
मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी शासन येथील गतिमान दळणवळणावर भर देत आहे. ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ने नांदेड राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आले असून यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे. प्रगत देशांसारखे आरामदायक सुविधा असलेली भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्याचेच प्रतीक आहे.
नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना, प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती ‘ वंदे भारत’ एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस च्या सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.




