Bhushan Gavai: कोल्हापूर खंडपीठ देशातील सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी मैलाचा दगड, लवकरच खंडपीठात रूपांतर करणार; राजर्षी शाहूंच्या भूमीतून शाहू आंबेडकरांना स्मरत सरन्यायाधीशांचा शब्द

कोल्हापूरच्या सर्किट बेंचचे आपण लवकरच खंडपीठात रूपांतर करणार आहोत. जे महाराष्ट्राला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मागे आहे असं म्हणतात त्यांना कामातून उत्तर दिलं आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले.
Bhushan Gavai on Kolhapur Circuit Bench: कोल्हापूर खंडपीठ देशात सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी मैलाचा दगड ठरेल. सर्किट बेचचं रुपांतर लवकरच कायमस्वरुपी खंडपीठमध्ये होईल, पुढील 10 वर्षात याच खंडपीठातून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तयार होतील, असे उद्गार देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काढले. मी कधीच सर्किट बेंच म्हणणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आराध्ये यांनी सर्किट बेंचच्या पर्मनंट बेचसाठी प्रस्ताव पाठवावा, माझ्याकडे सव्वा तीन महिन्यांचा कालावधी आहे तो सुद्धा कमी नाही, अशा शब्दात त्यांनी कायमस्वरुपी खंडपीठासाठी शब्द दिला. भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्धाटन करण्यात आले. गवई यांचे कोर्ट परिसरामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. गार्ड ऑफ ऑनर देण्यात आल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारत, ताराबाई इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, कोल्हापूर सर्किट नियुक्त न्यायमूर्ती यांच्यासह सहा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वकील, बार कौन्सिलचे प्रतिनिधी उपस्थित होते. गवई यांनी आपल्या भाषणातून खंडपीठासाठी खारीचा वाटा उचललेल्या प्रत्येक घटकाचा उल्लेख करत आभार मानले. अवघ्या 20 दिवसांमध्ये सर्किट बेंचसाठी इमारत तयार करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टीमचे त्यांनी विशेष आभार मानले.
सहा जिल्ह्यातील पक्षकारांबरोबर वकिलांसाठी खूप मोठी संधी
ते पुढे म्हणाले की, सहा जिल्ह्यातील पक्षकारांबरोबर वकिलांसाठी खूप मोठी संधी निर्माण केली आहे. कोल्हापूर खंडपीठातून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती निर्माण होतील यामध्ये मला अजिबात शंका नाही. महाराष्ट्र सरकार लवकरात लवकर खंडपीठाच्या इंट्रास्ट्रक्चर साठी लागेल ती मदत करेल. त्यांनी सांगितले की, अजितदादा आज उपस्थित नाहीत नाही, तर मुख्यमंत्री समोरच मी सांगितलं असतं. केवळ पुणे बारामती करू नका पुणे कोल्हापूर एक्स्प्रेस वे तयार करा, असेही ते म्हणाले.




