महाराष्ट्र

BEST Election Result: बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे गटाला अतिआत्मविश्वास नडला? पहिल्याच निवडणुकीत ठाकरे ब्रँडला धक्का

BEST Election Result: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू मोठं यश खेचून आणतील, अशी चर्चा होती. मात्र, ग्राऊंड लेव्हलला कामाचा अभाव आणि अंतर्गत नाराजीमुळे ब्रँड ठाकरेचा पराभव

BEST Election Result: राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मनसे आणि उबाठा या दोन्ही पक्षांनी एकत्र येत लढवलेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बेस्ट पतपेढीतील 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शशांक राव (Shashank Rao) यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनने 14 जागा जिंकल्या तर महायुतीच्या नेत्यांनी एकत्र येऊन उभारलेल्या सहकार समृद्धी पॅनलला 7 जागांवर विजय मिळाला होता. तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नव्हती. या दारुण पराभवामुळे शिवसेना-मनसे आणि ठाकरे ब्रँडला (Thackeray Brothers) मोठा धक्का बसला होता. राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एकत्र येण्याची इतकी चर्चा असताना बेस्ट निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव कसा झाला, याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटत आहे. या निवडणुकीत उत्कर्ष पॅनेलमध्ये ठाकरे गटाचे 19 आणि मनसेचे दोन उमेदवार होते. या निवडणुकीतील पराभवासाठी ठाकरे गटाचा निष्काळजीपणा आणि अतिआत्मविश्वास कारणीभूत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेला पॅनल तयार करताना अतिआत्मविश्वास नडला. तयारी न करताच ठाकरे बंधूंचे एकत्र पॅनल जाहीर करणे, शिंदे यांच्या शिवसेनेतील एका महिलेला उमेदवारी देणे, असे निर्णय घाईघाईत घेण्यात आले. कामगार सेनेच्या विद्यमान संचालक मंडळावर गैरव्यवहाराचे आरोपांचा मुद्दा विरोधकांनी प्रचारात लावून धरला होता. शशांक राव यांनी बेस्टच्या कामगारांची रखडलेली देणी, ग्रॅच्युएटी आणि बेस्ट पतपेढीचा मनमानी कारभार यावरुन आंदोलनही केले होते. मात्र, ठाकरे गटाचे नेते गाफील राहिले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मतदार आपल्याकडे वळतील, असा फाजील आत्मविश्वास ठाकरे गटाच्या नेत्यांना होता. याचा मोठा फटका कामगार सेनेला बसला. बेस्टमध्ये मनसेच्या संघटनेची फारशी ताकद नाही. त्यामुळे या निवडणुकीत मनसेचे फक्त दोन उमेदवार होते. ठाकरे गटाने 19 उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे या निवडणुकीचा जास्त जबाबदारी त्यांची होती. मात्र, ठाकरे गटाचा गाफीलपणा आणि निष्काळजीपणा यामुळे उत्कर्ष पॅनलचा दारुण पराभव झाल्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button