Ajit Pawar : माणिकराव कोकाटेंची उचलबांगडी करत दत्तात्रय भरणेंना कृषिमंत्री का केलं? अजित पवारांनी सभेत सांगितलं राज’कारण’; म्हणाले…

Ajit Pawar : माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांची कृषिमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.
Ajit Pawar : शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य आणि विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) चांगलेच अडचणीत सापडले होते. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांची कृषिमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. आता यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मिश्कील वक्तव्य करत दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती का केली? याबाबत भाष्य केले आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या परिसंवाद आणि वार्षिक अधिवेशनातून ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणाला उभं राहताच सूत्रसंचालकांची खास शैलीत फिरकी घेतली. राजकारण्यांसारखा जॅकेट घातलाय अन् चुकांवर चुका करताय. राजकारणी तर चुकतात अन् तुम्ही पण चुकांवर चुका करताय, असे त्यांनी म्हटले.
…म्हणून दत्तात्रय भरणेंना शोधलं
अजित पवार पुढे म्हणाले की, द्राक्ष बागायतदार संघाचे वार्षिक अधिवेशन शेतापासून आता थेट हॉटेल टीप टॉपपर्यंत येऊन पोहचले आहे. जसं जसं संघ विस्तारत चालला आहे, तशा अपेक्षा ही वाढत चालल्या आहेत. कृषी मंत्र्यांचं आत्तापर्यंत सारखं काय न काय तर निघतंय. शेवटी ठरवलं, आता असा कृषीमंत्री शोधू त्याचं काही बाहेर निघायला नको. म्हणून दत्तात्रय भरणेंना शोधलं, असे त्यांनी म्हटले. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.




