महाराष्ट्र

Gopichand Padalkar: आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते, आव्हाडांच्या कार्यकर्त्यासोबत हाणामारी कशी झाली? गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

Gopichand Padalkar & Jitendra Awhad Clash: जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी रात्री विधिमंडळाच्या लॉबीत हाणामारी झाली होती.

Gopichand Padalkar on Vidhan Bhavan Rada: विधानभवनाच्या आवारात गुरुवारी संध्याकाळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या समर्थकांमध्ये हाणमारी झाली होती. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले होते. यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विधानभवनात नेमके काय घडले, हे सविस्तरपणे सांगितले.

काल मी या सगळ्या प्रकारावर भूमिका व्यक्त केली होती. मी माननीय अध्यक्ष महोदयांकडे दिलगिरी व्यक्त केली. मी अध्यक्षांना विनंती केली होती की, आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली. त्यांना सक्त ताकदी देऊन जी काय कारवाई करायची ती करा, असे मी त्यांना सांगितले. हा विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारितील विषय आहे. रात्री उशीरा याप्रकरणात एफआयआर दाखल झाला. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे सर्वोच्च असतात. त्यांच्या भूमिकेवर आमचं कुठलंही मत नाही, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत. जी कारवाई झाली आहे, त्याला कोर्टात आम्ही सामोरे जाऊ. तुम्ही सगळे व्हिडीओ बघा. मी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कोपऱ्यात माझ्या कार्यकर्त्यांसोबत उभा होतो. तेव्हा नितीन देशमुख आमच्याजवळ आला, त्याची आणि माझी कोणतीही ओळख नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत फोटो काढत होतो. माझी लक्षवेधी असल्यामुळे मी दिवसभर सभागृहात होतो. रात्री सभागृहात मंत्री नसल्यामुळे माझी लक्षवेधी रद्द करण्यात आली, त्यामुळे मी सभागृहाबाहेर आलो. आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आहे, आम्ही त्या निर्णयाचा आदर करतो. आम्ही याविरोधात न्यायालयात लढाई देऊ, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. यावर पत्रकारांनी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना अडवले का नाही, असा प्रश्न पडळकरांना विचारला. त्यावर पडळकर यांनी काही न बोलता, ‘नंतर या सगळ्या विषयावर बोलू’, असे सांगत काढता पाय घेतला.

गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गुरुवारी मध्यरात्री पोलिसांची गाडी अडवून ठेवण्याच्या ठिय्या आंदोलनावरही भाष्य केले. पोलिसांच्या गाडीसमोर झोपणे किंवा अडवणे ही गुंडगिरी नाही का, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button