Ganesh Gite : अजितदादांनंतर शरद पवारांना नाशिकमध्ये मोठा धक्का; हिरेंपाठोपाठ आता ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

Ganesh Gite : गेल्या काही दिवसात नाशकात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नेत्यांची इनकमिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
Ganesh Gite : गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये भाजपत (BJP) मोठ्या प्रमाणावर नेत्यांची इनकमिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार अपूर्व हिरे (Apoorva Hiray) हे देखील उद्या (दि. 2) भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. आता या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाला (NCP Sharad Pawar Faction) नाशिकमध्ये (Nashik News) मोठा धक्का बसलाय. कारण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शरद पवार गटाचे नेते गणेश गीते (Ganesh Gite) हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गणेश गीते हे मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. महाजन यांनी गणेश गीते यांना दोन वेळा स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी उमेदवारी दिली होती. त्याच काळात, बांधकाम व्यावसायिकांच्या जमिनी महापालिकेला हस्तांतरित करताना सुमारे 800 कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला होता. मात्र, या व्यवहारात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यावर अनेक शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवले होते. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणावरून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सातत्याने महापालिकेविरोधात आंदोलन केले. या संतापाचा केंद्रबिंदू प्रामुख्याने गणेश गीते होते.
तसेच विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी गणेश गीते इच्छुक होते. मात्र, भाजपने आमदार राहुल ढिकले यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिल्याने गणेश गीते यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. गणेश गीते यांचा राहुल ढिकले यांनी पराभव केला. त्यानंतर गणेश गीते भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसपासून रंगली होती. आता येत्या दोन दिवसात गणेश गीते आणि त्यांच्या समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.