दाढी पिकली, डोक्यावर केस उडालेत, जगभ्रमण करून झालंय, सत्तेची सगळ सुखं भोगली; संघच मोदींना सूचना देत आहे आता निवृत्त व्हा; आता संजय राऊतांनी सुद्धा वाट पेटवली

Sanjay Raut on PM Modi Retirement: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना सूचना देत आहे की तुम्हाला निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
Sanjay Raut on PM Modi Retirement: येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत. त्यांची दाढी पिकली आहे. त्यांची डोक्यावरची केसही उडाले आहेत जगभ्रमण करून झालं आहे. सगळी सुखं त्यांनी भोगली आहेत. वयाच्या 75 वर्षानंतर निवृत्तीचा नियम मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच केला आहे. मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना सूचना देत आहे की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
मोदींनी आपल्या स्वार्थासाठी निवृत्ती लादली
संजय राऊत म्हणाले की, आपल्याला आठवत असेल मी या संदर्भात एक रोखठोक लिहिलं होतं. नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात प्रथमच गेले होते. तेव्हा सरसंघचालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली होती त्याचा सारांश मी दाखवला होता. नरेंद्र मोदी यांनी स्वतःच नियम केला, तसेच संघाने नियम केला 75 वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी. मोदींनी आपल्या स्वार्थासाठी सत्तेच्या पदावरून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीने लादली. आपला मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांना निवृती लादण्यात आल्याचे राऊत म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवृत्तीनंतर काय करणार? याबाबत सुतोवाच केल्यानंतर संजय राऊत यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, निवृत्तीनंतर कोणी काय करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. जीवनात अनेक चांगल्या गोष्टी करायला येतात. जसे आमचे नानाजी देशमुख होते. त्यांनी उत्तम प्रकारचे कार्य केले. अनेक जण आपापल्या भागात सामाजिक आणि इतर काम करत असतात. त्यांच्यापेक्षा आपल्याला कोण काय करणार त्याविषयी चर्चा करण्याचे कारण नाही. किंबहुना या दोघांच्या मनात निवृत्तीचे विचार येत आहेत हे देशासाठी शुभ संकेत असल्याचा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला.
काय म्हणाले मोहन भागवत?
मोरोपंत पिंगळे यांच्या पंचहत्तरीची आठवण सांगत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सूचक वक्तव्य केले. नागपुरात वनामती सभागृहात संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिवंगत मोरोपंत पिंगळेंच्या जीवनावरील इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी मोरोपंत पिंगळे यांच्या पंचहात्तरीची आठवण सांगताना सरसंघचालक म्हणाले की, वृंदावन येथे आयोजित संघाच्या एका बैठकीत मोरोपंत पिंगळेंच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांचा सत्कार करण्याचे ठरले. त्यावेळी तत्कालीन सरकार्यवाह हो.वो. शेषाद्री यांनी मोरोपंतांचा शाल पांघरून बहुमान केला. त्यावेळी मोरोपंत म्हणाले होते की, ‘पंच्याहत्तरीचा अर्थ मला कळतो. माणसाची पंच्याहत्तरी झाली की, आपण बाजुला होऊन इतरांना संधी दिली पाहिजे’, असे मोरोपंत तेव्हा म्हणाले होते, अशी आठवण सरसंघचालकांनी यावेळी सांगितली.