महाराष्ट्र

नागपंचमीच्या सणाला, पाळण्यातील 30 जणांचा जीव टांगणीला; बार्शीत खेळाच्या मैदानावर जत्रा भरवल्याची चर्चा

नागपंचमीनिमित्त बार्शीतील भगवंत मैदानावर उभारण्यात आलेल्या मनोरंजन पार्कमधील अतिभव्य प्री पॉल पाळणा बुधवारी रात्री साधारण 9 वाजताच्या सुमारास अचानक बंद पडला.

सोलापूर : महाराष्ट्रात सर्वत्र नागपंचमीचा (Nagpanchami) उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहात संपन्न झाला. सांगली जिल्ह्यातील शिराळ्यासह अनेक ठिकाणी नागदेवतांचे पूजन करुन हा सण साजरा झाला. तर, सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी येथे नागपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी जत्रा भरली होती. खेळाचे मैदान असलेल्या शहरातील भगवंत मैदानात मोठ-मोठ्या पाळण्यांसह खाद्यपदार्थ, विक्री स्टॉलची उभारणी करण्यात आल्याने बार्शीकरांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळाली. मात्र, येथील एक पाळणा अचानक बंद पडल्याने पाळण्यात बसलेल्या 30 जणांचा जीव टांगणीला लागला होता. सुदैवाने काही तासांत सर्वांना क्रेनच्या सहाय्याने खाली उतरविण्यात आले. मात्र,नगरपालिकेच्या क्रीडा मैदानावर पाळण्यांची उभारणी केल्याने सुजाण नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नागपंचमीनिमित्त बार्शीतील भगवंत मैदानावर उभारण्यात आलेल्या मनोरंजन पार्कमधील अतिभव्य प्री पॉल पाळणा बुधवारी रात्री साधारण 9 वाजताच्या सुमारास अचानक बंद पडला. पाळणा वर गेल्यानंतर अचानक बंद पडल्याने जवळपास 30 ते 35 लोकांचा जीव टांगणीला पडला होता. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. पाळणा बंद पडल्याची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन टीम घटनास्थळी पोहचली. पाळण्याची उंची जास्त असल्यामुळे खासगी क्रेनच्या सहाय्याने अडकलेल्या लोकांना खाली उतरवण्यात आले, पाळण्यातून खाली उतरल्यानंतर लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, या घटनेनंतर पुन्हा एकदा भगवंत मैदानावर पाळणे उभारण्यास परवानगी दिल्याने बार्शी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर सुजाण नागरिक आणि पत्रकारांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

खेळाचे मैदान मनोजरंजनासाठी का?

बार्शी नगरपालिकेच्या समोरच असलेलं भगवंत मैदाने हे बार्शीकरांचं क्रीडा मैदान आहे. शहरातील क्रीडापटूंना हक्काचं आणि भविष्यात क्रीडा क्षेत्रात नाव कमाविण्यासाठी घाम गाळण्याचं ठिकाण आहे. मात्र, येथील मैदानावर खेळ कमी आणि मनोजरंजन व प्रदर्शनाचे कार्यक्रम सातत्याने होत असतात. त्यामुळे, या भगवंत मैदानाच्या उभारणीचा उद्देशच घुळीस मिळाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे सध्या बार्शी नगरपालिकेवर प्रशासन असून सर्वस्वी अधिकार मुख्याधिकाऱ्यांकडे आहेत. त्यातच, बार्शी नगरपालिकेच्या ठरावात देखील ह्या मैदानाचा वापर केवळ क्रीडा व खेळाडूंसाठी करण्यात येईल, कुठल्याही प्रदर्शन किंवा मनोरंजनासाठी करू नये, असे नमून करण्यात आल्याची माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली. मात्र, तरीही मैदानावर खेळ कमी आणि मनोरंजन जास्त होत असल्याने मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या हेतुवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button