Mumbai News: गोरेगावमधील मित्रांच्या ग्रुपची ‘ती’ पिकनिक अखेरची ठरली, वसईच्या चिंचोटी धबधब्यातील डोहात दोघे बुडाले, गळ टाकून मृतदेह बाहेर काढले

Mumbai News: चिंचोटी धबधब्यात मुंबईतील दोन तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर चार जण बचावले आहेत, अतिउत्साह पर्यटकांच्या जीवावरती बेतल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.
वसई : वसईच्या चिंचोटी धबधब्यावर काल (सोमवारी) पिकनिकसाठी गेलेल्या गोरेगावच्या दोन तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. धबधब्यावर पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुलं डोहात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धबधब्यापर्यंत दोन तासाची पायपीट करत जाऊन, एकाला पाण्यामध्ये बुडून तर दुसऱ्याला गळाच्या साहाय्याने बाहेर काढण्यात यश आले आहे. प्रेम प्रल्हाद शहजराव (वय 22) रा. अशोक नगर काम इस्टेट रोड गोरेगाव पूर्व तर सुशील भारत ढबाले ( वय 24) रा. अशोक नगर काम इस्टेट वालभात रोड गोरेगाव पूर्व असे मयत तरुणाचे नाव आहेत.
पाण्याचा अंदाज न आल्याने ते धबधब्याच्या डोहात बुडाले
गोरेगाव कॉलेजमधील 6 जणांचा ग्रुप काल (सोमवारी, ता, 14) वसईच्या चिंचोटी धबधब्यावर पिकनिक बनविण्यासाठी आला होता. याठिकाणी पोहत असताना 2 जणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते धबधब्याच्या डोहात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोहात पोहत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने आणि एकदंरीत पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात वाहून गेले. पाच तासांच्या शोध मोहिमेनंतर दोन तरूणांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले आहे.
हे सर्वजण गोरेगावच्या अशोक नगर काम इस्टेट परिसरात राहणारे होते, हा सहा तरुणांचा एक ग्रुप काल (सोमवारी, ता 14) सकाळी नायगाव येथील प्रसिध्द चिंचोटी धबधब्यावर सहलीसाठी गेला होता. यामध्ये अमित यादव (19) विलास कदम (19), सुभाष सरकार (19) पवन पांडे (19) प्रल्हाद शहजराव (22) आणि सुशील ढबाले (24) यांचा समावेश होता. हे सर्वजण गोरेगावच्या महाविद्यालयात शिकणारे होते. दुपारी ते धबधब्याच्या पुढे असलेल्या डोहात पोहण्यासाठी गेले. त्यापैकी कुणाला पोहता येत नव्हते. अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. चौघे जण कसेबसे डोहाच्या बाहेर आले. मात्र प्रल्हाद (22) आणि सुशील डबाळे (24) असे दोघे वाहून गेले.
तो भाग निर्जन होता त्यामुळे त्या ठिकाणी मदतीसाठी कुणी नव्हतं. घटनेबाबत त्यांच्या मित्रांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील बापाणे पोलीस चौकी येथे पोहचून माहिती दिली. पाच तासांच्या शोध मोहीमेनंतर संध्याकाळी प्रल्हाद सहजराव आणि सुशील डबाळे यांचे मृतदेह हाती लागले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या मदतीने घटनास्थळी जाऊन शोध घेतला. सुमारे 5 तास ही शोधमोहीम सुरू होती. संध्याकाळी 6 च्या सुमारास दोन्ही बेपत्ता तरुणांचे मृतदेह आढळल्याची माहिती, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळाराम पालकर यांनी दिली. यामध्ये अन्य 4 तरूण सुखरूप बचावले आहेत. तर दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आह, या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.