Manikrao Kokate: मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही; राजीनामा देणार का?, प्रश्न विचारताच कृषीमंत्री कोकाटे काय म्हणाले?

Manikrao Kokate: माझी महाराष्ट्रात बदनामी झाली आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे, ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
Manikrao Kokate: विधिमंडळाचं कामकाज सुरु असताना ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल (Manikrao Kokate On Playing Rummy Video) झाल्यामुळे वादात सापडलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, ही चर्चा फोल ठरली आहे. कारण माणिकराव कोकाटे यांनी आज (22 जुलै) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी माणिकराव कोकाटे यांनी राजीनाम्याच्या घोषणेऐवजी कृषी विभागाच्या एका नव्या योजनेची घोषणा केली. माणिकराव कोकाटे यांनी कृषी समृद्धी या नव्या योजनेचे लाँचिंग करत असल्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाच हजार कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. मात्र, त्याचा जीआर निघणे बाकी होते, तो आज निघाला, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेसंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला.
मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, तो इतका लांबला का ते माहिती नाही. ऑनलाईन रमी हा प्रकार तुम्हाला माहिती नाही का, तो खेळण्यासाठी त्याला मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट जोडावा लागतो. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लिकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा, ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरु झाली आहे, तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचा आहे. यामुळे माझी महाराष्ट्रात बदनामी झाली आहे. कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे, ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिला.