Jharkhand Accident News: कावडियांच्या बसची ट्रकला जोरदार धडक, 18 भाविकांचा मृत्यू, झारखंडमध्ये भीषण अपघात

Jharkhand Accident News : झारखंडमधील देवघरमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने 18 भाविकांचा मृत्यू झाला आहे.
Jharkhand Accident News : झारखंडमधील (Jharkhand) देवघरमध्ये (Deoghar) मंगळवारी सकाळी भीषण अपघात (Accident News) झाला आहे. बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. यात 18 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हंसडीहा रस्त्यावरील मोहनपूर प्रखंडाच्या जमुनिया चौकाजवळ बस आणि ट्रकमध्ये धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या टीम देखील घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. बाबा बैद्यनाथ मंदिरात पूजा करण्यासाठी कावडियांनी भरलेली बस जात होती.
चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सदरचे एसडीओ रवी कुमार म्हणाले की, पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की, देवघरहून बासुकीनाथला भाविकांना घेऊन जाणारी 32 आसनी बस नियंत्रणाबाहेर गेली आणि एका ट्रकला धडकली. त्यानंतर बस विटांना धडकली, असे त्यांनी सांगितले आहे.




