Devendra Fadnavis: कंत्राटं मिळवण्याच्या मागे लागू नका, आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा; देवेंद्र फडणवीसांचा भाजप आमदारांना सल्ला

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना आपले चारित्र्य आणि कामकाज निष्कलंक ठेवण्याच्यादृष्टीने काही सल्ले दिले आहेत. फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Warns BJP MLAs: आपल्या पक्षाने जे संस्कार दिले आहेत, ते घेऊनच पुढे जा. सरकारी कंत्राटं मिळवण्याच्या मागे लागू नका, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या आमदारांना दिला. आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा आहे, त्यानुसार पुढे जा. विकासाची कामे करताना आपल्या मतदारसंघाचे कशात भले आहे, त्याचा विचार करूनच कामे करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना सांगितल्याचे समजते. ते गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत बोलत होते.
तसेच देवेंद्र फडणवीस यांनी फेक नरेटिव्हरच्या मुद्द्यावरुनही भाजप (BJP) आमदारांना मार्गदर्शन केले. विरोधकांनी फेक नरेटिव्ह तयार करायच्या आधीच सरकारच्या आणि पक्षाच्या बाजूने नरेटिव्ह तयार करा, असा कानमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर नुकताच स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला होता. या मेजवानीसाठी महायुतीचे आमदार आणि मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळीही देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या नेत्यांना वादग्रस्त वक्तव्यं टाळण्याचा सल्ला दिला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी झालेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांनाही वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्याचे समजते. ‘महायुतीत वाद होतील, अशी वक्तव्य टाळा’, अशी स्पष्ट सूचना सर्वांना दिली. महायुतीमध्ये वाद होईल, असे कोणतेही वक्तव्य करु नका. एखादे वादग्रस्त वक्तव्य करुन पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुतीमधील (Mahayuti) वाचाळवीर आमदारांना दिली होती.
Mahayuti: महायुतीचा महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
महायुती सरकाराचा महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महामंडळाच्या महत्त्वानुसार अ, ब, क वर्गवारी करण्यात आली आहे. सर्वाधिक आमदार असल्याने भाजपच्या वाट्याला 48 टक्के पदे येतील. शिवसेनेच्या वाट्याला 29 टक्के, तर राष्ट्रवादीला 23 टक्के महामंडळ मिळणार आहेत. राज्यात एकूण 138 महामंडळांमध्ये 785 सदस्य संख्या आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री महामंडळांचे वाटप करतील.