मोठी बातमी! 10 जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये ग्राम विकास विभाग 2, सहकार पणन 1, विधि व न्याय विभागाचे 2, महसूल 1 आणि जलसंपदा विभागाच्यावतीने 2 निर्णय घेण्यात आले
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ (Mantralay) बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये, उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आला आहे. प्राथमिक तत्त्वावर राज्यातील 10 जिल्ह्यात उमेद मॉल (Mall) उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 10 जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) ची उभारणी केली जाणार असून महिला बचत गटाने तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचं काम या उमेद मॉलच्या माध्यमातून होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये ग्राम विकास विभाग 2, सहकार पणन 1, विधि व न्याय विभागाचे 2, महसूल 1 आणि जलसंपदा विभागाच्यावतीने 2 निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, उमेद मॉलची उभारणी करुन 10 जिल्ह्यातील बचत गटांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 मिनिटे मंत्र्यांचा क्लास घेतला. वादग्रस्त विधाने, कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असेच प्रकार होत राहिले तर सरकारची प्रचंड बदनामी होते. ही अखेरची संधी, काय कारवाई करायची ती करुच, पण आता एकही प्रकार खपवून घेणार नाही, अशी तंबीच मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.




