Amol Mitkari : मी सत्ताधारी आमदार, पण मलाही भावना आहेत; पीएला विधानभवनाच्या गेटवर अडवल्यावर अमोल मिटकरी संतापले

Amol Mitkari : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या पीएला विधान भवनाच्या गेटवर रोखण्यात आले होते. त्यामुळे अमोल मिटकरी चांगलेच संतापल्याचे दिसून आले.
Amol Mitkari : विधिमंडळ परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या समर्थकांमध्ये गुरुवारी जोरदार राडा झाला. विधान भवनातील राड्यानंतर आज सुरक्षेसंदर्भात कठोर नियमावली राबवण्यात येत आहे. अभ्यांगतांसाठी आज विधानभवनात प्रवेश नाही. यलो पास धारकांना प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे. सोबतच, ग्रीन पासधारक सरकारचे अधिकारी असेल तरच प्रवेश मिळणार आहे. इतरत्र व्यक्तींना विशेष परवानगी पत्र घेऊनच आज विधानभवनमध्ये प्रवेश मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या पीएला विधान भवनात सोडण्यास मज्जाव करण्यात आला. यामुळे अमित मिटकरी चांगलेच संतापल्याचे दिसून आले.
अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, या लोकांना उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे. काल दिवसभर मकोका मधले आरोपी, तडीपार असलेल्या आरोपींना विनापास मोकाट सोडले आणि आजचा अंतिम दिवस असताना जाणीवपूर्वक आमच्याकडे पास वगैरे असताना इथले सुरक्षारक्षकांनी अडकवून ठेवलेले आहे. सकाळी दहा वाजेपासून माझं विधान परिषदेचे कामकाज आहे. मी सभापतींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, माझा संपर्क झाला नाही. मात्र, ही अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. लोकप्रतिनिधी सोबत त्याचा स्वीय्य सहाय्यक असतो. माझा केअर टेकर माझ्यासोबत दररोज असतो. मात्र, आज त्याला अडवून जाणीवपूर्वक थांबवून ठेवले आहे.
मी आज इथेच ठिय्या आंदोलन करणार : अमोल मिटकरी
त्यांना हे शेवटच्या दिवशी दिसत आहे का? आतापर्यंत झोपले होते का? विधानभवनाची सुरक्षा हेच उधळून लावतात आणि हेच परत आम्ही किती सुरक्षित आहोत ते सांगतात. काल या पोलिसांनी मकोकामधले आरोपी सोडले, त्यावेळी ते झोपले होते का? आजच्या शेवटच्या दिवशी यांना हे सुचत आहे का? जोपर्यंत माझ्या पीएला सोडणार नाही, तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे. मी आज इथेच ठिय्या आंदोलन करणार आहे. शेवटच्या दिवशी अशा पद्धतीचे तमाशे पोलीसवाले करत असतील तर हे आमच्या सरकारसाठी देखील ही लाजिरवाणी बाब आहे. मी सत्ताधारी आमदार जरी असलो तरी मला जाण्याचा अधिकार आहे. माझ्या माणसांना इथे अडवले जात आहे. मी सरकार मधला आमदार असलो तरी आमच्या देखील काही भावना आहेत. आम्ही काय दहा गुंड घेऊन चाललेलो नाही, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.