महाराष्ट्र

टॉप 5 मधील मंत्रिपदासाठी भाजप प्रवेश रखडल्याची चर्चा, जयंत पाटील हसत हसत म्हणाले, पराचा कावळा कशाला करता!

विशेष म्हणजे या वृत्तानंतर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया देताना 15 जुलै रोजी नवा प्रदेशाध्यक्ष ठरेल, त्यासाठी 4 जणांची नावे देण्यात आली असल्याचे म्हटले होते.

मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) यांच्या राजीनाम्याची गेल्या तीन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी ही चर्चा फेटाळून लावली होती. पण, जयंत पाटलांचं भाजप प्रवेशाबाबत तळ्यात मळ्यात सुरू असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले. प्रवेशाबाबत जयंत पाटील आणि राज्यातल्या भाप (BJP) नेतृत्वाची इतक्यात दोनदा भेट झाल्याचं समजतंय. पण जयंत पाटलांना मंत्रिमंडळात टॉपच्या पाचपैकी कोणतंतरी एक खातं हवं आहे म्हणून ही चर्चा थांबल्याचेही वृत्त होते. आता, जयंत पाटील यांनी याबाबत स्वत: पुढे येऊन आपली भूमिका मांडली. तसेच, आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा (Resignation) देखील दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. विशेष म्हणजे या वृत्तानंतर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया देताना 15 जुलै रोजी नवा प्रदेशाध्यक्ष ठरेल, त्यासाठी 4 जणांची नावे देण्यात आली असल्याचे म्हटले होते. तर, आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी समोर आल्यानंतर त्यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना 15 जुलै रोजीच्या बैठकीचा संदर्भ दिला होता. आता, जयंत पाटील यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळले आहे. तसेच, भाजपमध्ये जाणार नसल्याचेही स्पष्टीकरण दिले.

संबंध चांगले, म्हणून भेटीगाठी

भाजपने माझाशी काही संपर्क केलेला नाही, माझे भाजप नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मी मुख्यमंत्र्यांना भेटलं की भाजपमध्ये चाललो असे नाही. मगाशी मी उपमुख्यमंत्री शिंदें नाही भेटलो, कुणाला तरी भेटलो म्हणून बातम्या करणं थांबायला हवं, असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून म्हटले. तसेच, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व साधारण बैठक बोलावली आहे, दुपारी 3 वा ही सर्वसाधारण बैठक आहे, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.

मी शरद पवारांच्या पक्षाचा अध्यक्ष

मला कुणी विचारलेलं नाही, ना मी कुणाला विनंतीही केली नाही. एखाद्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या व्यक्तीबद्दल अशा वावड्या उठवल्या जात आहेत. बातम्या चालू आहेत की, मी कुठल्या पक्षात जाणार आहे. पाटलांचं ठरलं, पण कशावरुन अडलं अशा बातम्या चालत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं. मी या बातम्या लगेच नाकारत नाही, कारण अशा बातम्या सातत्याने येतात, असे जयंत पाटील यांनी म्हटलं. मी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करणारा कार्यकर्ता आहे. मी शरद पवार यांच्या पक्षाचा अध्यक्ष आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे वृत्त देखील फेटाळले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button